( रत्नागिरी )
तालुक्यातील शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी २५० × २५० म्हणजे तब्बल ६२ हजार ५०० चौकोनांचे कोडे पूर्ण केले असून या कोड्याची दखल इंडिया बुकने घेतली आहे. या कोड्यामध्ये १३ हजार ८८६ आडवे शब्द आणि १३ हजार ८४५ उभे शब्द आहेत. हे शब्दकोडे बनवायला त्यांना सुमारे चार वर्षे लागली. काही वेळा व्यत्यय आल्यामुळे हे विहीत मुदतीत पूर्ण झाले नाही. परंतु कांबळी यांची कोडी दोन वेळा इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहेत. कांबळी यांनी हा एक विक्रम केला आहे. लिम्का बुकमध्ये एकदा व इंडिया बुकमध्ये दोनदा असा तीन वेळा राष्ट्रीय विक्रम केला आहे. आता एशिया बुकसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.
दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे, दहा हजार शब्दकोडी असे विक्रम कांबळी यांच्या नावावर आहेत. आज हॉटेल आरती डायनिंग येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. श्री. कांबळी गेली तीस वर्षे शब्दकोडी तयार करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी सर्व दैनिके आणि साप्ताहिकांमधून त्यांची शब्दकोडी प्रकाशित झाली आहेत. विशिष्ट विषयावर कोडे, पाच मिनिटांत कोडे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल, अशी अनेक कोडी त्यांनी रचली आहेत. ते म्हणाले, एकूण दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. २५० चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे त्यांनी तयार केले आहे.
कांबळी यांनी सन १९९५ पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरूवात केली. श्री. कांबळी हे मुळचे वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावचे. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र कृषी उद्योग मर्यादित या शासनाच्या अंगीकृत उद्योगातून ते वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे यामुळे ते लोकप्रिय आहेत.
उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले श्री. कांबळी यांनी श्री गणेशाचे बेचाळीस लाख जप केले आहेत. गेल्या सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून ‘चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि अर्धांगिनी सौ. मयुरी यांच्या सहकार्याने हे यश मी खेचून आणले, असे त्यांनी सांगितले. तसेच या शब्दकोड्यासाठी वैभव भाटकर (ठाणे), मुलगा ओंकार, मुलगी सुरभी, मकरंद पटवर्धन, सौ. मृणाल पटवर्धन यांचे सहकार्य लाभले व प्रसन्न आंबुलकर, शेखर भुते यांनी प्रोत्साहन दिल्याचे प्रसन्न कांबळी यांनी सांगितले.