(देवरूख / सुरेश सप्रे)
अज्ञात शक्तीच्या मदतीने पक्ष व चिन्ह बळकावले तरी उगवत्या सुर्याप्रमाणे तळपत पुन्हा भरारी घेवून गद्दारांना जनताच धडा शिकवेल असे प्रतिपादन शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह व पक्ष अज्ञात शक्तीच्या मदतीने अजित पवार गटाने हिसकावून घेतले असले तरी माझ्या जिल्ह्यातील जनतेला व आमच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना काही फरक पडत नाही. आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही उभे राहून शरद पवार यांच्याकडे असलेल्या ताकदवान कार्यकर्तेंचे जोरावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस उगवत्या सुर्याप्रमाणे तेजाने तळपेल असा आत्मविश्वास रत्नागिरी जिल्हाध्यक्ष (शरद गटाचे) सुरेश तथा बारक्याशेठ बने यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून घड्याळ चिन्हासह मान्यता दिल्यावर राजकीय वातावरण एकच खळबळ उडाली आहे. यावर जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांना छेडले असता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवार यांनी १९९९ साली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक पदांचा उपभोग घेत अजित पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनी स्वतःच्या स्वार्थीसाठी गद्दारी करत पक्षात फुट पाडली व संस्थापक अध्यक्ष यांनाच बाजूला करत पक्षावर कब्जा मिळविला आहे, हे खेदजनक आहे. ज्यांच्या मुळे आपण राजकीय पदे भोगत मोठे झालोय याचा विसर पडलेले स्वार्थी विचार करत दुही माजवून वेगळ्या विचारांसोबत स्ववहित साध्य करण्यासाठी वेगळ्या विचारांसोबत जात बाजूला झालेल्या घरभेदींना सामान्य जनता चांगलीच ओळखून आहे. शरद पवार यांचे देशासह राज्यपातळीवरील योगदान जनता जाणते. या स्वार्थी व फसवेगिरी करत जनतेची दिशाभूल करत असलेल्यांचे सुज्ञ जनताच येत्या निवडणुकीत पानिपत करत त्यांना धडा शिकविले शिवाय राहणार नाही. असा विश्वासही बने यांनी व्यक्त केला.