(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच संपूर्ण तालुका शिंदे गटाचा बालेकिल्ला होत चालल्याने ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आता शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मालगुंडमधील काही ठाकरे गटाचे तालुकास्तरावरील बडे नेते शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून त्यांचे समर्थक असलेल्या मालगुंडमधील काही कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटात जाण्याची तयारी केल्याची सध्या चर्चा आहे.
एकूणच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून शिंदे गटाने आपली आपली ताकद निर्माण केली आहे. आता मालगुंड, गणपतीपुळे परिसरात शिंदे गटाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील शिवसेनेचे काही तालुकास्तरीय बडे नेते प्रवेश करणार असल्याने आता निष्ठावंत शिवसैनिक नेमके कोण? असा प्रश्न सध्या केला जात आहे. तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेतील काही बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे काम केल्याचेही बोलले जात आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून याच बड्या नेत्यांकडून बोलले गेले होते आणि एक प्रकारे अविश्वास दाखवला होता. मात्र, आपणच निष्ठावंत असा बहाणा करणाऱ्या यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणायचं की गद्दार, असा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
एकूणच राजकीय क्षेत्रात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा वैरी नसतो, हेच अंतिम सत्य असून राजकारण हे सामान्य कार्यकर्त्यांचे नाही, तर बड्या नेत्यांचे बेडूक उड्या मारण्याचे राजकारण झाले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एकूणच रत्नागिरी तालुक्यातील ठाकरे गटाच्या काही बड्या नेत्यांनी जर शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला तर विशेषत: मालगुंडमध्ये जुना व नवा गट निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे गट शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी ठाकरे सेनेतील या नव्या नेत्यांचा प्रवेश फार डोकेदुखी ठरणार असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत.