(मुंबई)
तीन दशकाहून जास्त काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची बातमी समोर येत आहे. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलंय. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका ठेवून त्यांनी भाजपाला रामराम केला. परंतु, आता ते पुन्हा भाजपवासी होण्याचा चर्चांना उधाण आलंय.
एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ खडसेंनाच या जागेवरून उमेदवारी मिळाल्यास सून-सासरे असा जंगी सामना रंगण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनीच स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, या काळात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच काळात त्यांनी दिल्लीवारी केल्याने या चर्चांना बळ मिळालं. परंतु, आपण भाजपात जाणार असल्याच्या अफवा असल्याचं खडसेंनी वारंवार सांगितले आहे. तसंच, या चर्चांना रक्षा खडसे यांनीही पूर्णविराम दिला होता. परंतु, या चर्चा सुरू असतानाच एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालंय. एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून सूनेविरोधात लढण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या वृत्तात म्हटलंय.
खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपमध्ये जाण्याचे सध्या तरी कुठलेही कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईन त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेन. शरद पवार यांच्या संमतीनेच जाईन. मी काही लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन, असे वक्तव्य केले होते. माझे राजकीय करिअर संपण्याच्या मार्गावर असताना मला शरद पवार यांनी साथ देऊन विधान परिषदेचा आमदार केले. त्यामुळे मी पक्षबदल करणार नाही आणि मी भाजपमध्ये गेलो तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना सांगूनच जाईन, असे खडसे यांनी वारंवार सांगितले. याचा अर्थ मी पक्ष बदलणारच नाही असा होत नाही, तर पक्षश्रेष्ठींना विचारून जाईन, असे खडसे म्हणाले होते.
विशेष म्हणजे खडसे यांचे खास मित्र असलेले विनोद तावडे त्यांच्या घरवापसीसाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग करत आहेत. भाजपच्या दिल्ली पक्षश्रेष्ठींमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या तावडे यांच्या शब्दाला पक्षात सध्या वजन आहे. या वजनाचा वापर करून ते खडसे यांना पुन्हा भाजपवासी करू शकतात, अशी माहिती आहे. तावडे सर्वच ठिकाणी राज्यात भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचा एक भाग म्हणजे एकेकाळी सक्षम नेतृत्व असेलेले आणि आता बाहेर असलेल्या माजी भाजप नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत.