(संगमेश्वर / एजाज पटेल)
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावचे तरुण युवक मयूर निकम यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून, शास्त्रीपुल आंबेड-डिंगणी मुख्य मार्गांलगत आंबेड येथे त्यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी अनेकांची लक्षणीय अशी उपस्थिती होती.
मयूर निकम हे राजकारणाबरोबर समाजकार्यात सक्रीय असणारे तरुण युवक असून 20 टक्के राजकारण तर 80 टक्के समाजकारण हे ध्येय डोळ्यासमोर घेऊन वावरणारे सर्वत्र सुपरिचित असून त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा आहे. काहीही झालं तरी कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा ध्यास मयूर निकम यांनी घेतला असून यासाठी ते प्रचंड ऊर्जेने कामाला लागले आहेत. त्यांच्या मित्रपरिवारानेही त्यांना साथ देण्याचा ठाम असा निर्णय घेतला आहे.
आजपर्यंत रस्ते, पाकाड्या, पाणी, सरक्षण भिंती यावरच निवडणुका लढल्या गेल्या. कोकणात रोजगार प्रकल्प आणून तरुणांना रोजगार कस देता येईल याकडे मात्र निहमीच पाठ फिरवण्याचेच काम झाले. कोकणातील चाकरमानी हा कोकणातच रहायला पाहिजे, तो कोकणात राहिला तर कोकणातील बंद घरे उघडी राहतील. त्यासाठी कोकणात रोजगार प्रकल्प आणून कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगारासाठी तरुणांना गाव सोडून मुंबई, पुणे आदी शहराच्या ठिकाणी स्थलांतर व्हावे लागते ते थांबेल. येथील बंद घरे उघडे कसे राहतील हा एकच ध्यास घेऊन आपण होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे व आपल्या बरोबर तरुण युवकांचे पाठबळ असल्याने आता शर्यतीमधून माघार नाही, काहीही झालं तरी लढायचंच हा निर्धार असल्याचे मयूर निकम यांनी सांगितले.