(रत्नागिरी)
घर सोडून गेलेली पत्नी मिळत नसल्याच्या मानसिकतेतून गुहागर येथील तरुणाने जयगड जेटी येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. ही घटना शुक्रवारी ( ५ जुलै २०२४) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
असीम आदम जांभारकर (२५, रा. पडवे गुहागर, रत्नागिरी) असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवार, २ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास त्याची पत्नी घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. ती आपल्या चुलत्याकडे रत्नागिरीला असल्याची माहिती त्याला मिळाली. तिचा शोध घेण्यासाठी तो रत्नागिरीत गेला; परंतु पत्नी चुलत्याच्या घरी आढळून आली नाही. या खचलेल्या मानिसकतेतून त्याने शुक्रवारी सकाळी ६ वा. सुमारास जयगड जेटीवर उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या भावाच्या लक्षात येताच त्याने असीमला प्रथम अबलोली येथील रुग्णालयात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.