(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील (ता. संगमेश्वर) धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सापडला. या घटनेला बारा दिवस उलटले तरीही अद्याप हत्या की आत्महत्या, याचे कोडे उलगडलेले नाही. तसेच या प्रकरणाबाबत संगमेश्वर पोलिसांवर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा अधीक्षकांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संशयित आरोपींना जेरबंद करण्यासंदर्भात निवेदन देखील दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशांत पवार ही व्यक्ती घरातून गायब असल्याचे नोंद किंवा तक्रार संगमेश्वर स्थानकात दाखल केली होती. परंतु त्यानंतर कुटुंबीयांना अपेक्षित पोलीस प्रशासन कारवाई संदर्भात दखल घेताना दिसली नाही किंवा कोणताही शोध घेताना दिसले नाही, मृतदेह हा गावातच आठ दिवसानंतर सापडतो याचा अर्थ काय? पोलीस प्रशासन त्या आठ दिवसात कोणताही तपास करताना दिसले नाहीत हि खंत कुटुंबाची आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी मृतदेह सापडला. त्यानंतरही बरेच दिवस उलटून गेले आहेत आणि कुटुंबीयांनी ज्यांच्या संदर्भात संशय व्यक्त केला आहे त्यांचाही तपास करण्यास पोलीसांकडून दिरंगाई का होतेय? गुन्हेगारांना वेळीच दहशत बसणार नसेल तर अशा प्रकारचे गुन्हे जिल्ह्यात वाढतच जाणार असतील तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. परंतु आम्हाला आशा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आपल्या स्तरावरून होऊन पीडित कुटुंबाला योग्य असा न्याय मिळेल त्यामुळे आपण याची विशेष दखल घेऊन आरोपींना लवकरच जेरबंद करावे. अशी मागणी निवेदनातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रत्नागिरी जिल्हा अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पोलिसांचा तपास थांबलाय की….
प्रशांत पवारचा संशयास्पद मृतूदेह कोरड्या नदी पात्रातील झाडाझुडपात मिळाला. प्रशांतची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांचा आहे. परंतु या घटनेला बारा दिवस उलटले असून अद्यापही कुटुंबियांनी ज्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे त्यांची पोलीसांकडून चौकशी का केली जात नाही? नेमका पोलिसांचा तपास थांबलाय की तपासाने गती घेतलेय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच प्रशांतच्या व्हीसेरा अहवालाकडे ही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.