पंतप्रधान मोदी हे भारतातच नाही तर जगातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याने त्यांच्या अगदी बारीक सारीक हलचालींवर, सोशल मिडियामध्ये आलेल्या पोस्टवर संपूर्ण जगाचं लक्ष असतं. म्हणूनच त्यांच्यासंदर्भातील कोणतीही गोष्ट लोकांच्या नजरेतून सुटत नाही. सध्या अशीच एक गोष्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीमागे काेट घालुन सातत्याने फिरणारी ती तरूणी नेमकी काेण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मोदींचा या तरुणीबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे. यावरुन आता मोदी समर्थक आणि विरोधक आमने-सामनेही आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण
२७ नोव्हेंबर २०२४ रोजी पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये मोदी एका व्यक्तीबरोबर चालताना दिसत असून त्यांच्यामागे एक तरुणी चालताना दिसत आहे. सुटाबुटात असलेली ही तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणीचं नेमकं नाव काय आहे ? हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र ही तरुणी या फोटोत मोदींच्या नजीक का आहे आणि काय करत आहे? याबद्दलची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील (एस.पी.जी.)(S.P.G.) कमांडो आहे. अनेकांनी मोदींचा हा फोटो व्हायरल केला असून पहिल्यांदाच एस.पी.जी.(S.P.G.)मध्ये महिला कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला आहे. सी.पी.टी.(C.P.T.) नावाची तुकडी एस.पी.जी.(S.P.G.)अंतर्गत येणाऱ्या क्लोज प्रोटेक्शन ग्रुप (सी.पी.टी.)(C.P.T.) टीममधील ही महिला असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणी येऊ नये म्हणून हे कमांडो तैनात केलेले असतात. सध्या एस.पी.जी.(S.P.G.)मध्ये १०० महिला कमांडो आहेत. यापूर्व राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या सुरक्षेसाठी महिला एस.पी.जी.(S.P.G.) कमांडो तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधानाच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.
पहिल्यांदाच महिला एस.पी.जी.(S.P.G.) कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी एस.पी.जी.(S.P.G.)मध्ये २०१३ पासून या विशेष दलातील महिलांना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये सामावून घेण्यात आलं आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असल्याचं दिसून आलं होतं.
या फोटोवरून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीजीमध्य़े पहिल्यांदाच महिला आलेल्या नाहीत. एसपीजीमध्ये महिलांना आधीपासून सुरक्षेसाठी तैनात केले जात आहे. सुरुवातीच्या काळात एसपीजीमध्ये महिलांना एडवान्स्ड डेप्लॉयमेंटसाठी ठेवले जात होते. महिला एसपीजीचा जो फोटो व्हायरल होत आहे, तो फोटो संसदेच्या आतील आहे. व्हायरल झालेला फोटो २७नोव्हेंबर रोजीचा आहे. संसदेत एसपीजीच्या महिलांना तैनात केले जाते.