(रत्नागिरी)
रोजगाराच्या निमित्ताने बांगलादेशातील नागरिकांना एजंटांद्वारे बेकायदेशीरपणे भारतात आणले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एजंटांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी रत्नागिरीत अटक केलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांकडून पोलिस एजंटाबाबत माहिती घेत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे- कालकरकोंड भागात चिरेखाणीवर बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पहाटेच्या सुमारास जेरबंद केले. एकाच वेळी १३ जणांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) यांच्या चिरेखाणीवर नाखरे कालकरकोंडवाडी येथे जून २०२४ पासून वैध कागदपत्र नसताना राहत होते. त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केला होता.
पोलिसांनी चौकशी केली असता या १३ बांगलादेशी नागरिकांकडे भारताची सीमा ओलांडताना कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. बंगालमधून ते रेल्वेने भारतात आले. तेथून एका एजंटद्वारे रोजगारासाठी ते रत्नागिरीत आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. ज्या एजंटामार्फत हे नागरिक भारतात आले ते कोठून आले, तो एजंट कोण आहे, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या एजंटचा शोध घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक केलेल्या नागरिकांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
रत्नागिरीत अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत असून, अजूनही कोणी नागरिक अवैधरीत्या जिल्ह्यात वास्तव्याला आहेत का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
गृहविभागाला देणार माहिती
रत्नागिरी येथे पकडण्यात आलेल्या घुसखोरीबाबत शासनाच्या गृहविभागाला माहिती दिली जाणार आहे. शासन याबाबत निर्णय घेऊन, त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवण्यासाठी एक टीम तयार केली जाईल. या टीमद्वारे त्यांना पुन्हा बांगलादेशात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस दलाने दिली.