(दापोली)
दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पूर्ण भारतभर सूरु असलेल्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बुधवार १४ रोजी दापोली तालुक्यातील जि.प.साखळोली नं.१ शाळेत कारगील योध्दे माजी सैनिक संजीवन साळवी यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हिजन दापोलीमधील या उपक्रमांतर्गत श्री. साळवी यांची एक मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांचा बालपणापासून सैन्यातील देशसेवेचा प्रवास सांगितला.
मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दाद देत, “शालेय शिक्षण पूर्ण करुन स्वत:चे जीवन जगत असतांना समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे ही भावना मनात रुजवा, तसेच उच्चप्रतीचं चांगले शिक्षण संपादीत करुन आपले भविष्य घडवा” असा संदेश दिला. तर सैन्यात भरती होणेसाठी स्वयंस्फूर्तीने पाऊलवाट निर्माण करीत, कष्टाने सैन्यात गेल्याचे तेही दोन वेळा अपयश येऊन सुध्दा जिद्द न सोडता जे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी धडपड न सोडता प्रयत्न केले आणि तिसर्या वेळी सैन्यात भरती झाल्याचे त्यांनी सांगितले.
तद्नंनंतर विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेल्या राख्या साळवी यांना बांधून “एक राखी जवानांसाठी” या गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या उपक्रमासाठी साळवी यांचेकडे सुमारे दिडशे राख्या सिमेवरील जवानांसाठी सुपुर्द केल्या. सुरेश पाटील यांनी स्वागत तर मुख्याध्यापक संजय मेहता यांनी साळवी यांचे आभार व्यक्त केले. मुलाखतीचे सुत्रसंचलन कु.ऋग्वेद लोवरे याने केले. यावेळी मुख्याध्यापक संजय मेहता, शाळेतील शिक्षक समीर ठसाळ, महेश व्यवहारे, सैनिक पत्नी शाळेतील शिक्षिका नयना पाटील आदि उपस्थित होते.