(गुहागर)
मंगळवार दिनांक ०८/१०/२०२४ रोजी गुहागर तालुका अध्यक्ष श्री.तारेश हळदणकर यांच्या पुढाकाराने त्यांचे डोंबिवली येथील बंधू यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नाम.श्री. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली येथील नमो रमो नवरात्रोत्सव निमित्ताने आरतीसाठी संध्याकाळी उपस्थित असतात, याची माहिती घेऊन येथे भेटीचे नियोजन केले होते.
त्यानुसार राज्यातील संगणक परिचालक यांचा प्रश्न मांडण्यासाठी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री समीर ओक, जिल्हा सल्लागार श्री.स्वप्नील कृष्णा आग्रे, गुहागर तालुकाध्यक्ष, श्री. तारेश हळदणकर, सदस्य श्री. मयूर दरीपकर, श्री.साईस दवंडे, मंडणगड येथील श्री.विधान पवार, श्री.प्रसाद जाधव, दापोली तालुका सचिव श्री.अमोल चव्हाण यांनी रविंद्र चव्हाण यांची भेट होईल या आशेने दुपारीच डोंबिवली येथे दाखल होवून संध्याकाळी नमो रमो नवरात्रोत्सव आरती वेळी सायं. ०७.३० सुमारास श्री. चव्हाण यांची भेट घेतली.
सदर भेटीवेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.समीर ओक यांनी राज्यातील सुमारे २० ते २२ हजार संगणक परिचालक यांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याची आमची मागणी असल्याचे सांगून सदर मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी करून त्याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी श्री. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आता जवळपास ही शेवटची वेळ असून एक कॅबिनेट बैठक शिल्लक आहे. त्यात निर्णय होण्याच्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो सांगून ग्रामविकास खात्याकडे याबाबत लेखी स्वरूपातही पाठपुरावा करतो असे सांगितले.
राज्यभरातील सर्व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री महोदय यांनी मान्य कराव्यात अशी विनंती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संगणक परिचालक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यध्यक्ष समीर ओक यांनी म्हटले आहे.