( संगमेश्वर )
तालुक्याची काही महिन्यांपूर्वी आमसभा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडली होती. देवरुख शहरातील विकास कामांच्या मुद्यावरून आयोजित आमसभा प्रचंड गाजली. कोट्यवधी रुपयांचा निधी देवूनही कामे नित्कृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला होता. अखेर सभेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी नागरिकांना सोबत घेवून कामांची पाहणी करा, कामे चुकीच्या पद्धतीने झाली असतील तर संबंधित ठेकेदाराकडून चांगल्याप्रकारे ती करून घ्या, अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या. मात्र याला ५२ दिवसांचा कालावधी उलटूनही तक्रारदारांशी नगपंचायत प्रशासनाने संपर्क साधलेला नाही. एक प्रकारे आमदारांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्याचा प्रकार आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संगमेश्वर तालुक्याची आमसभा देवरुख येथे माटे भोजने सभागृहात १७ ऑगस्ट रोजी आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. आमदार शेखर निकम यांनी देवरुख शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मनात कोणताही हेतू न ठेवता देवरुख शहराचा कायापालट करण्यासाठी त्यांनी निधीची लयलूट केली. मात्र हा निधी योग्य ठीकाणी खर्ची पडला नाही, तसेच झालेली विकासकामेही नित्कृष्ट दर्जाची झाल्याची ओरड मनोहर गुरव, शेखर जोगळे, सुनिल करंडे, प्रमोद रेवणे, यशवंत गोपाळ आदी नागरिकांनी आमसभेत केली. देवरुख शहरातील विकास कामांच्या मुद्यावरून ही आमसभा सर्वाधिक गाजली. कामे नित्कृष्ट दर्जाची झाली तर मंजुर झालेला निधी कोणाच्या घशात गेला असे संतप्त बोल नागरिकांमधून उमटले. या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी आमदार महोदयांकडे केली होती.
यावर आमदार निकंम यांनी मुख्याधिकारी चेतन विसपुते यांना नागरिकांना सोबत घेवून कामांची पाहणी करा. कामे चुकीच्या पद्धतीने झाले असेल तर संबंधित ठेकेदाराकडून चांगल्याप्रकारे काम करून घ्या, असे सुचित केले होते. आमसभेला जवळ जवळ दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी तक्रारदारांच्या प्रश्नांचे निरसन झालेले नाही. आमदार शेखर निकम, नगपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार का याकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.