(सांगली)
जिल्ह्यातील जत मार्गावर क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ७ जण जागीच ठार झाले तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या अपघातात क्रूजरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाले तर २ जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला.
विजयपूर-गुहागर महामार्गावर हा अपघात घडला आहे. सांगली जिल्ह्यातील जतवरुन येणाऱ्या जत-मुंबई लक्झरी बसला क्रुझरने धडक दिली. या जीपमधून लग्नाचे वऱ्हाड (14 ते 15 जण) प्रवास करत होते. जत मार्गावरुन जात असताना चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप लक्झरी बसला जाऊन धडकली. जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
ही धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे चालकासहित पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभासाठी जात होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
जमखंडीवरुन सावर्डेला निघालेल्या वऱ्हाडींनी आपल्यासोबत लग्नासाठी आणलेले साहित्य, रुखवत अपघातानंतर रस्त्यावर पडले होते. अपघातस्थळाचे दृष्य खुपच भीषण होते. क्रुझरने बसला दिलेली धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात चालकासह पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला