(गणपतीपुळे / वैभव पवार)
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड मानवजातीसाठी अनमोल असा बौद्ध धम्म दिला आहे. त्यामुळे त्यांच्या महान कार्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञ असले पाहिजे असे प्रतिपादन बौद्धाचार्य तथा तथा खंडाळा हायस्कूल येथील माध्यमिक शिक्षक सुवेश चव्हाण सर यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या विद्यमाने आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २२ पोमेंडी बुद्रुक यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास या धार्मिक प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख धम्मप्रवचनकार म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली पाहिजे. नुसती बुद्ध जयंती आणि भीम जयंती करताना नाचगाणी करून चालणार नाही तर आचरणशील जीवन जगण्यासाठी पंचशील आणि अष्टशीलाचे पालन केले पाहिजे. तसेच प्रत्येक महिलांनी आपल्या कुटुंबाला बदलताना बौद्ध धम्माची व बाबासाहेबांनी दिलेली शिकवण लक्षात घेऊन अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. तरच आपल्याला धम्माचा अनमोल ठेवा काटेकोरपणे जपता येईल. यावेळी धम्मप्रवचनकार चव्हाण सर यांनी विविध उदाहरणे आणि गोष्टीरूप दाखले देऊन धम्मप्रबोधन केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेवटी आवाहन केले की, आपण बाबासाहेबांचे महान विचार डोळयासमोर ठेऊन समाजात व आपल्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे आणि आपली वैचारिक प्रगती झाली पाहिजे. तरच आपल्याला देशाची शासनकर्ती जमात बनता येईल आणि खरेखुरेर बौद्ध अनुयायी बनता येईल. हा कार्यक्रम बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. २२ पोमेंडी बुद्रुकचे अध्यक्ष विजय राघो पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी या शाखेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली पवार आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी रत्नागिरी तालुका शाखेचे उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, चिटणीस रविकांत पवार, तालुका शाखेच्या उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी, गाववार प्रतिनिधी, बौद्धाचार्य,श्रामणेर तसेच रत्नागिरी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष तु. गो. सावंत, भिम युवा पॅंथर रत्नागिरी चे माजी अध्यक्ष प्रीतम आयरे, माजी उपाध्यक्ष प्रमोद पवार, बसपा रत्नागिरी चे राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोमेंडी बुद्रुक येथील सर्व महिला व पुरुष आणि तरुण मंडळाने विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन बुद्रुकचे चिटणीस किशोर पवार यांनी केले.