(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खडेबबंबाळ रस्ते झाले आहेत. या रस्त्यांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा विविध प्रश्नांबाबत त्रासलेल्या, कंटाळलेल्या नागरिकांचा आक्रोश समजावा यासाठी संवाद सभेचे आयोजन करून “आम्ही रत्नागिरीकर” या नावाने सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दिनांक २८ जुलै रोजी) एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या संवाद सभेत आमदार उदय सामंत यांचे कार्यकर्ते, समर्थकांनी प्रचंड गोंधळ निर्माण करून थेट सभेचा ताबा मिळवला. या गदारोळात एका आयोजकाला सामंत समर्थकांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.
या बैठकीला रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुरुवात होणार होती. मात्र ही बैठक काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्याची तयारी आयोजक करत होते. मात्र त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांच्या जमावाने बैठक पुढे गेली असून येणाऱ्यांना कळविण्यासाठी थांबलेल्या विजय जैन आणि मिलिंद किर यांना घेराव घालून धुडगूस घातला. ही घटना पाहून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्याच पावसाच्या दणक्याने शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून मोठं-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमधून बसणारे दणके प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना चांगलेच हैराण करत आहेत. प्रत्येक रस्त्यावर एखादा जीवघेणा मोठा खड्डा आहे. शिवाय छोट्या- मोठ्या खड्ड्यांची खोली देखील आता वाढत जात आहे. मुसळधार पावसात खड्ड्यामधून रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. एखाद्या खड्ड्यात दुचाकीचे चाक अडकण्याची भीती निर्माण होत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात सुद्धा झाले आहेत. खड्डेबंबाळ रस्त्याबाबत प्रशासनाविरोधात अनेक पक्ष, संघटनांनी आंदोलने देखील केली आहेत.
काँक्रीटीकरण करण्यासाठी पावसापूर्वी चांगल्या रस्त्यावर जो डांबर खडीचा थर करण्यात आला होता तो देखील पहिल्याच पावसाच्या दणक्यात उखडला. या खड्डेबंबाळ रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. तसेच पाण्याबाबतही काही भागात समस्या आहेत अशा विविध प्रश्नांबाबत रत्नागिरीकरांसोबत संवाद घडवून आणून शासन- प्रशानाविरोधात पुढील भूमिका घेण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षांच्या बॅनर शिवाय या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सांमत समर्थकांनी आयोजित सभा सुरू होण्यापूर्वीच या सभेत २०० ते २५० समर्थक आणत पूर्ण सभाच काबीज केली. निमंत्रक “विजय जैन” यांना समर्थकांनी चारही बाजूने घेरत धक्काबुक्की करून सांगा आपले प्रश्न कोणते? असा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी विजय जैन यांनी आजची मिटींग सर्वसामान्य रत्नागिरीकरांची होती; मात्र अशा वातावरणात ती होऊ शकणार नाही आणि मला जरी ठार मारण्याचा प्रयत्न केलात, तरी मी तुमच्या अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा देणार नाही, अशी निर्भिड भूमिका घेतली. हे बोलल्यानंतर त्यांना आक्रमक झालेल्या सामंत कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओतील दृश्यामधून दिसून येत आहे.
विरोधात बोलल्यावर ठोकून काढू…
या सभास्थळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढाच उपस्थितांसमोर वाचून यापुढे पालकमंत्र्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेतला जाणार नाही, तसेच भविष्यात सोशल मिडियावर पालकमंत्री यांच्याविरोधात कोणी काही बोलल्यास ते सहन करणार नाही, प्रसंगी ठोकून काढू असा इशाराही दिला आहे. या एकूणच सर्व घडलेल्या धतींगबाजीच्या प्रसंगातून रत्नागिरीकर धास्तावले आहेत.
सामंत यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
शहरातील खड्ड्याबांबत सामंत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जबाबदारी स्वीकारून मुख्याधिकारी तुषार बाबर यांना रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश देखील दिले आहेत. परंतु पावसाचा जोर कायम असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा येत आहे. मात्र राजकारणातील अत्यंत मुत्सद्दी नेतृत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते. मुळात अशा बैठकांचे उद्देश स्पष्ट असताना ही सामंत समर्थकांनी भर सभेत घुसून गोंधळ घातल्याचे कृत्य अशोभनीय आहे. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या कार्यकर्त्यांच्या कृतीचा निवडणुकीत उदय सामंत यांनाच फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
सामंत यांनी दिले होते आदेश?
मंत्री सामंत हे एका राजकीय पक्षाचे नेते असले तरी जिल्ह्याचे पालक देखील आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याने लोकांच्या भावना समजून घेणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील विविध विषयांबाबत “आम्ही रत्नागिरीकर” या बॅनरवर सुज्ञ नागरिक एकत्र येत सभेचे आयोजन केले तर आमदार उदय सामंतांच्या विकास कामांचा प्रश्न का निर्माण व्हावा? आयोजित बैठकीत सामंत समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो यावरून मंत्री सामंत यांनीच कार्यकर्त्यांना सभा उधळून लावण्याचे आदेश दिले होते का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. घडलेल्या प्रकारावरून सामान्यांचा आवाज डांबण्याचा प्रकार सुरू झाला आहे अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मनाई आदेश धुडकावला ?
बैठक सुरू होण्यापूर्वी साधारण तासाभरापूर्वी सामंत समर्थक मारुती मंदिर येथील सामंत यांच्या कार्यालयात एकत्र जमले. त्यानंतर त्यानी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सामंत यांच्या कार्यालयातून सभेच्या ठिकाणच्या दिशेने येण्यास सुरुवात केली. शेकडो लोक या बैठकीच्या स्थळी एकाच वेळी आले. पोलीस प्रशासनाकडून मनाई आदेश असतानाही हा जमाव राजकीय व्यक्तीच्या कार्यालयात जमतो कसा? आयोजित बैठक बंदिस्त ठिकाणी होणार होती तर मग जमाव जमला ते ठिकाण सामंत यांचे कार्यालय होते. हा मनाई आदेशाचे उल्लंघन नाही का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून पोलिस प्रशासनाने ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे. याउलट पोलिसांनी विजयकुमार जैन आणि मिलिंद कीर या दोघांना नोटीस बजावली आहे. परंतु सामंत समर्थक कार्यालयात एकत्रित जमून सभा स्थळी रवाना झाले. यावर मात्र पोलिसांनी कोणालाही नोटीस बजावल्याची अद्याप तरी माहिती मिळालेली नाही. यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेकडून आता कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे का? असा ही सवाल आता सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.