(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीचे उ. जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून जखमी झालेल्या अण्णा जाधव यांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. रविवारी, ८ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. माझ्यावर हल्ला करण्याचे संपूर्ण कांड किंवा नियोजन भास्कर जाधव यांचे आहे, असा घणाघाती आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. चिपळूण तालुक्यातील कलबट फणसवाडी बौद्ध समाजाबद्दल अवमानजनक केलेल्या वक्तव्याबाबत आमदारांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पोलिस कारवाई करत नसल्यामुळे या सर्व बाबींच्या निषेधार्थ १२ डिसेंबर २०२४ रोजी चिपळूण पोलीस उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत हल्ल्याचा सर्व घटनाक्रम अण्णा जाधव यांनी सांगितला. ते म्हणाले की, माझ्यावर हल्ला करताना हल्लेखोर म्हणत होते की, तु खूप उछलतो, खूप भाषणं करतो व शेठला बोलतो का? असे म्हणत हल्ला करण्यास सुरुवात केली. हल्ल्याचा सर्व प्रकार कशाने घडलेला आहे? का घडलेला आहे? याबाबत सर्व माहिती पोलिसांना दिली. परंतु हल्ल्यानंतर हॉस्पिटलमधून प्रतिक्रिया दिली होती की, हे सर्व कांड भास्कर जाधव यांनी घडवले आहे. त्यांनां तत्काळ अटक करा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा,p मात्र आजपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही म्हणूनच याच्या निषेधार्थ येणाऱ्या १२ डिसेंबर रोजी अख्खा रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाज, कार्यकर्ते विराट मोर्चा काढणार आहेत. बौद्ध समाजाला महार म्हटले गेले आहे, जे शब्द बोलले गेलेत याचा अर्थ बौद्ध समाजाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे आम्ही महार नाहीत , समाजातील जो घरात बसून राहील तो महार असेल अशा शब्दात अण्णा जाधव यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आयोजित केलेल्या मोर्चात राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, रायगड येथील लोक निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक गुरुवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी चिपळूणमध्ये दाखल होणार आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे तीन तेरा वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा शब्दात जिल्हाध्यक्ष जाधव यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर प्रहार केला.
एक दिवस जमावबंदीचा आदेश शिथिल करावे
यापुढे अण्णा म्हणाले की, मला ठावूक आहे. पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. जमाव बंदीचे आदेश लागू करून अशा माणसांना पाठीशी घालत असाल तर आज माझ्यावर हल्ला केलाय उद्या सर्वसामान्यांना बघणार नाही, अधिकारी बघणार नाही, महिला बघणार नाही, ही व्यक्ती कोणाचीच नाही. परवानगीबाबत सातत्याने प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. विधानसभेत छातीठोक भाषण ठोकणाऱ्या भास्कर जाधव यांना थांबवायचं असेल तर एक दिवस शासनाने अटी शर्ती शिथील कराव्या आणि एक दिवस निषेध व्यक्त करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, अशी विनंती देखील प्रशासनाला अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
बहुजन समाजालाही जाधवांचे आवाहन
यानिमित्ताने मी बहुजन समाजाला विनंती करत आहे, हा विषय केवळ बौद्ध समाजापुरता मर्यादित नाही तर बहुजन वर्गाचाही आहे. हा हल्ला एकट्या अण्णा जाधवांवर नसून बहुजनांवर झालेला हल्ला आहे. तरी त्या विरोधात दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वा. स्थळ-गुढे फाटा ते बहादूर शेख नाका चिपळूण येथून डी. वाय.एस.पी. (पोलिस उपअधीक्षक, चिपळूण) यांच्या कार्यालयावर विराट मोर्व्याचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजाने एकत्र येऊन हातात हात घालून ताकद निर्माण करावी, तरच मनुस्मृती मनुवादी प्रवृत्ती ही जागच्या जागी संपेल मगच या महाराष्ट्रामध्ये, देशांमध्ये लोकशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य प्रस्थापित होतील. चिपळूण येथील विभागीय पोलीस कार्यालयावर १२ तारखेस काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर करणार आहेत, असेही अण्णा जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. बहुजन वर्गाने जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सर्व बहुजन समाजाला केले आहे.
सुजात आंबेडकरांचे वक्तव्य चर्चेत
वंचित बहुजन आघाडीचे युथ आयकॉन सुजात आंबेडकर यांनी निवडणुकीदरम्यान उमेदवारांवर होणाऱ्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला होता. इकडे तर हेच म्हणतात महाराष्ट्राचा बिहार केलाय का, तर महाराष्ट्राचा बिहार करण्यासाठी ही सर्व लोक सामील आहेत, एकत्र आलेली आहेत. निवडणुकीचा काळ सुरू आहे म्हणून आम्ही थांबलो आहोत निवडणुका होऊन जाऊदे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना बघून घेऊ असा इशारा सुजात आंबेडकर यांनी एका माध्यमांशी बोलताना दिला होता. त्यामुळे सुजात आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आले असून सुजात आंबेडकर हे स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. ते या मोर्चात भास्कर जाधव यांच्याबाबत काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.