(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायत मधील शौचालय घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र-रत्नागिरीचे प्रचार प्रमुख निलेश राहाटे यांनी काही महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर उघडकिस आणला होता. त्यामध्ये ग्रामसेवक यांना पाच ( ५ लक्ष) लाख इतकी रक्कम भरणा करण्यासाठी आदेश पंचायत समितीकडून दिले होते.तसेच सरपंच यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.या शौचालय घोटाळा प्रकरणी फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, यासाठी निलेश रहाटे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
या घोटाळा विषयासंदर्भात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गट विकास अधिकारी जे.पी. जाधव यांनी दिलेल्या अहवालात ग्रामपंचायतच्या कारभारात गैरव्यवहार आणि अनियमितता दिसून येत आहे. घोटाळा झाल्याचे, कागदपत्रे खाडाखोड झाल्यासंदर्भात, अहवालात बदल केल्याचे प्रकार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत रहाटे यांनी संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा करून अखेर सोमवारी (२६ फेब्रुवारी २०२४ ) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ध-नग्न उपोषण करण्यात आले.
दरम्यान गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. येत्या २८ फेब्रुवारी २०२४ रोजी १२.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित करून कार्यवाही केली जाईल, अश्या आशयाचे पत्र राहुल देसाई यांच्या सहीने उपोषणकर्ते निलेश रहाटे यांना दिल्यानंतर उपोषण स्थगिती करण्यात आले आहे. मात्र नियोजित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकिरण पुजार हे संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सोडणार नाही
माहिती अधिकार महासंघाचे काम आणि कार्य या रत्नागिरी जिल्ह्याला ठाऊक झाले आहे, गैरव्यवहार करणाऱ्या कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अस सहजासहजी सोडणार नाही,तशीच शिकवण आम्हा कार्यकर्त्यांना आमचे अध्यक्ष सन्मा.सुभाष बसवेंकर आणि राज्य सचिव सन्मा.समिर शिरवडकर यांची आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया उपोषणकर्ते निलेश रहाटे यांनी दिली आहे