(रत्नागिरी)
एका युवतीने तिच्यावर चंपक मैदान येथे दिनांक 26/08/2024 रोजी अत्याचार झाल्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ बी.एन.एस. चे कलम 64 (1) अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणाबाबत शहरातील काही नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलसमोर रस्ता रोको देखील केला होता. परंतु आता फिर्यादीने गैरसमज होऊन सदरची फिर्याद गैरसमजातून दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाबाबत गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी 4 पोलीस अधिकारी व 7 पोलीस अंमलदार यांचे एक “विशेष तपास पथक” गठित करुन तपास करण्याचे निर्देश दिले होते.या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 26 साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आली व जबाब नोंदविण्यात आले. रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले व त्या आधारे तपास करण्यात आला तसेच या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी या युवतीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूसही करण्यात आली.
दरम्यान या युवतीचे सिव्हील हॉस्पीटल, रत्नागिरी येथे गुन्ह्याचे अनुषंगाने पूर्ण वैद्यकीय तपासणी करून नमुने घेण्यात आले व न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर यांच्याकडे तपासणी करिता पाठविण्यात आले. न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर यांचे कडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी होऊन त्यांचा अभिप्राय अहवाल विशेष प्राधान्याने व तात्काळ प्राप्त व्हावा या अनुषंगाने प्रयोग शाळेचे उपसंचालक यांना पत्रव्यवहार व संपर्क करण्यात आला. दिनांक 18/10/2024 रोजी सदरचा अभिप्राय अहवाल प्राप्त झाला व या अहवालामध्ये युवतीने दिलेल्या फिर्यादी मधील हकिगतीला पुष्टि देणारी माहिती नमूद नाही.
एकंदरीत असे समोर आले की, तांत्रिक पुराव्यांवरून, वैद्यकीय अहवालावरून, तसेच फिर्यादी युवतीला आरोग्यविषयक समस्या असल्याने, यातील फिर्यादी युवतीने केवळ तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले असावेत असा गैरसमज होऊन सदरची फिर्याद गैरसमजूतीने दिलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी न्यायालयात ही याबाबत अहवाल सादर केला आहे.