(दापोली)
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागातर्फे शिक्षण विभाग दापोलीचे स्विप कलापथक गावोगावी जाऊन लोकप्रबोधन करीत असून दापोली बसस्थानक तसेच केळसकर नाका येथे मतदान जाणीव जागृती करत विविध गीततगायन तसेच नाटिका सादर करणेत आल्या. स्विपचे नोडल आॅफीसर तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सहा.नोडल अधिकारी बळीराम राठोड यांचे मार्गदर्शनात दापोली विधानसभा मतदारसंघांतर्गत शिक्षण विभागातील शिक्षकांच्या कलापथकाने जनजागृती रॅली काढून पथनाट्य सादर केले.
ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्या सगळ्यांनी मतदान करावे, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पथकातील शिक्षकांनी घोषणा व गाणी म्हणत तसेच जनजागृतीपर नाटिका सादर करत २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी आपले बहुमोल मत देण्याचे आवाहन केले. हर्णे, गावतळे, दापोली बसस्थानक केळसकर नाका, पालगड अशा विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्याच्या आयोजनावेळी गावा- गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, पोलिस पाटील यांचेसह शाळांमधील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. बसस्थानकातील प्रवासी-प्रेक्षकांनी या जनजागृतीपर पथनाट्याचे कौतुक केले. तसेच आम्ही विधानसभेसाठी १००% मतदान करु अशी ग्वाही देत पथकाचे कौतुक केले. तसेच इतरांनाही सहभागी मतदिन करण्यास प्रवृत्त करू, असे अभिवचन ग्रामस्थांनी दिले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीआधी जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले होते. तसेच उपक्रम विधानसभेसाठी सुरु असल्याबाबत अण्णासाहेब बळवंतराव आणि बळीराम राठोड यांनी सांगितले.
सदर पथकातून संजय मेहता,बाबू घाडिगावकर, महेश गिम्हवणेकर, महेश शिंदे, वैजयंत देवघरकर, अल्केश नार्वेकर, नितीन गुहागरकर, सुनिल व विलास साळूंखेंसह अस्मिता बालगुडे, संजिवनी लाडे, सुनंदा मळगे, स्मिता कदम, राहूल राठोड आदि शिक्षक मतदान जाणीव जागृती करीत आहेत.