(दापोली)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप व्यवस्थापन अंतर्गत दापोली तालुक्यातील आपापल्या केंद्रात स्वीप कार्यक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच सदर कार्याक्रमाचे फोटो VIDEO, वृत्तपत्रे व बातम्याची कात्रणे व अहवाल रोजच्या रोज आपल्या कार्यालयाकडे सादर करावेत, अशा सूचना दापोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केल्या.
तालुक्यातील मतदान केंद्रातील प्रत्येक शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, प्रभातफेरी, रांगोळी प्रदर्शन यासारखे व याव्यतिरिक्त मतदान जनजागृतीसाठी दिवाळी सुट्टीमध्ये पालकांना पत्र लिहिणे, घरचा अभ्यास यामध्ये मतदार जनजागृतीपर घोषवाक्ये, निबंध, रांगोळी, शुभेच्छा संदेश इत्यादी उपक्रम राबवून त्याचे फोटो, व्हिडिओ सादर करावे तसेच विविध कार्यक्रमाचे नियोजन करावे व त्याबाबत नियोजन अहवाल कार्यालयाकडे सादर करावा. तसेच चुनाव पाठशाला (BAGS) चे आयोजन २६३ दापोली विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावे. जेणेकरून हा अहवाल मा. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी २६३ दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदार संघ यांना वेळोवेळी सादर करणे सोपे होईल त्या अनुषंगाने आपणास दिलेली कामे पार पाडावी अशा सुचना दापोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी आज शिक्षण विभागातील सर्व व्यवस्थापनेच्या शाळांना दिल्या.