( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रथितयश जलरंग निसर्गचित्रकार विष्णू परीट यांना आज जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ६४ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे सरूप आहे.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ६४ वे महाराष्ट्र राज्य कलाकार विभाग कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आले असून याचे उदघाटन आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सर्व कलाकृतींची राज्यपाल यांनी पाहणी करुन कलाकारांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर सचिव बि . वेणू गोपाल रेड्डी, अभिमत विद्यापीठ कूलगुरु रजनीश कामत, कलासंचालक संतोष क्षीरसागर, निरीक्षक संदीप डोंगर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला संचालक संतोष क्षीरसागर यांनी केले. कलासंचालनालयातर्फे तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच वेळी ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना चित्रकार वासुदेव गायतोंडे कलाजीवन गौरव पुरस्कार आणि चित्रकार शकुंतला कुलकर्णी यांना कलाजीवन गौरव पुरस्कार देवून राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चित्रकार शकुंतला अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक लक्ष रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. राज्यातून ७८० कलाकृती आल्या होत्या. यातील १४८कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. यातील १५ चित्रकारांच्या कलाकृतीना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले .याचवेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुलेखनकार अच्युत पालव यांना, त्यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात राज्यपालांनी सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. भारतीय कला किती श्रेष्ठ आहे, हे नमुद केले.
संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे या गावातील विष्णू परीट हे माध्यमिक विद्यामंदिर सोनवडे येथे कलाशिक्षक म्हणून निवृत्त झाले. परीट गेली ३५ वर्षे जलरंगामध्ये कोकणच्या निसर्गाची विविध रूपं आपल्या जादूई कुंचल्यातून साकारत आहेत. परीट यांनी आजवर जलरंगात शेकडो चित्रे रेखाटली आहेत. राज्याच्या विविध भागात त्यांची कला प्रदर्शने भरली आहेत. याच बरोबर जलरंगात त्यांनी शेकडो प्रात्यक्षिके दाखवली आहेत. विष्णू परीट यांना आज राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवल्या बद्दल त्यांचे ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सह्याद्रीचे प्राचार्य माणिक यादव, चित्रकार प्रा. अमित सुर्वे, लेखक जे. डी. पराडकर, प्रदीप परीट आदिनी अभिनंदन केले आहे.
जीवनातील आनंदायी क्षण
गेली ३५ वर्षे आपण निसर्गचित्र रेखाटत आहोत. कलेची सेवा आपल्या हातून होत असताना मनाला होणारा आनंद हा आपण प्रत्येक वेळी आपल्या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रसिकांनी आपल्या कलाकृतींवर आजवर जे प्रेम केले त्यामुळेच आज राज्य शासनाच्या कलासंचालनालयाचा मानाचा पुरस्कार महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आपल्या कलाकृतीला मिळू शकला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनातील अत्यंत आनंदायी क्षण आहे. या पुरस्काराने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे.
—विष्णू परीट, चित्रकार