(रत्नागिरी)
पावसाळी हंगामातील मासेमारी बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३ नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ३७ हजारांची मासळी जप्त केली आहे. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांपुढे याची सुनावणी होणार आहे. त्यानंतर नौकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी बंदी लागू आहे; परंतु अनेक मच्छीमार आदेश धाब्यावर बसवतात. अशा नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात आहे. रत्नागिरीतील समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी कारवाई केली आहे. मजीद भाटकर आणि मुकद्दर बोरकर यांच्या मालकीच्या या नौका आहेत. तसेच जयगड येथील समुद्रात मासेमारी करणाऱ्या लिना बिर्जे यांच्या नौकेवर परवाना अधिकारी स्मितल कांबळे यांनी कारवाई केली आहे.
बंदी काळात आदेश झुगारून मासेमारीसाठी गेलेल्या ३ नौका पकडून कारवाई केली आहे. या तिन्ही नौकांसंदर्भात सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. त्यानंतर नवीन मत्स्य धोरणानुसार संबंधित नौका मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.