(संगमेश्वर)
तालुक्यातील श्रृंगारपूर येथील संरक्षक भिंत आणि रस्त्याच्या कामासाठी श्रृंगारपूरचे सरपंच विनोद ऊर्फ बाबू पवार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला यश आले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या मध्यस्थीमुळे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी सुमारे ७५ लाखांचा निधी या कामांना मंजूर केल्याने पवार यांनी उपोषण मागे घेतले आहे.
श्रृंगारपूर येथे सन २०-२१ मध्ये रस्त्याची संरक्षक भिंत वाहून गेली व चारशे मीटरचा रस्ता पूर्णतः खराब झाला होता. शासन दरबारी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर सरपंच विनोद ऊर्फ बाबू पवार यांनी २५ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. दोन दिवस उपोषण सुरू होते. ही माहिती कळताच रोहन बने आपला चिपळूण दौरा सोडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांच्याशी चर्चा करून उपोषणस्थळी दाखल झाले.
सरपंच पवार व ग्रामस्थांशी चर्चा करून कामाची माहिती घेतली. कामाचे गांभीर्य ओळखून खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या बोरुरकर यांच्याशी चर्चा केली. तेथूनच त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला व तत्काळ निधीची मागणी केली.
पालकमंत्री सामंत यांनी तातडीने या रस्त्यासाठी २५ लाख आणि संरक्षक भिंतीसाठी ५० लाख असे ७५ लाख रुपये मंजूर केले. कामांना मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्ते विनोद ऊर्फ बाबू पवार यांना दिल्यानंतर त्यांनी रोजी २६ रोजी रात्री आठ वाजता उपोषण सोडले. सरपंचांच्या उपोषणाला यश आल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.