(दापोली)
तालुक्यातील डॉल्फिन सफरीसाठी निघालेल्या करजगाव तामसतीर्थ येथील ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या वाघर जातीच्या ४ कासवांना सुखरूप वाचवले. या चारही कासवांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून ग्रामस्थांनी पुन्हा समुद्रात सोडले. या कृतीचे त्यांचे कौतुक केले जात आहे.
करजगाव तामसतीर्थ येथील संदीप मोरे हे इतर चौघांना घेऊन सोमवारी (ता. ११) सकाळी १० वाजता डॉल्फिन सफरीला जात होते. साधारण किनारपट्टीपासून १०० मीटरच्या अंतरावर मच्छीसाठी जाळी लावण्यात आली होती. तिथे काहीतरी तडफडताना दिसले म्हणून ते जवळ गेले असता त्यांना जाळ्यात अडकलेले कासव दिसले. त्यांच्यासोबत सलील मोरे, सनिज शिरधनकर, संजय शेट्ये, प्रवीण शेट्ये, बंड्या व प्रितम बागकर होते.
मात्र जाळे ओढल्यावर त्यामध्ये चार कासवं अडकलेली दिसून आली. त्यांनी जाळे कापून कासवांना जाळ्यातून सोडवून फायबर बोटीत घेतले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. कारण दोघांच्या मानेभोवतीच जाळे अडकले होते, तर दोघांच्या पायात जाळे गुरफटले होते. कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली जाळ्यातून सोडवून खोल समुद्रात नेऊन सोडले. त्यांच्याबरोबर कासवमित्र संजय शेट्ये होते. या मादी कासव असून त्या किनाऱ्यावर अंडी घालायला येत असताना जाळ्यात अडकली असण्याची शक्यता यावेळी कासवमित्र शेट्ये यांनी व्यक्त केली, अशी माहिती करजगाव तामसतीर्थ येथील संदीप मोरे यांनी दिली. संरक्षित घरट्यातून आत्तापर्यंत दापोलीत ३८२ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.