(संगमेश्वर)
तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा शेंबवणे म्हादेवाडी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक गजानन देवराव कडू यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या वेळी ग्रामस्थांसह माजी विद्यार्थ्यांकडून सन्मान व सत्कार करण्यात आला.
३१ वर्षाची अविरत आणि अखंड सेवा देत काल ते सेवानिवृत्त झाले.स्वभावात गोडवा असलेले कडू गुरूजी १९९३ साली अमरावतीहुन कोकणात आले .आपल्या कडक शिस्तीसाठी ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आदर्श विद्यार्थी घडवले असून अनेक जण मोठ्या पदावर कार्यरत आहेत.तर अनेक विध्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली आहे. कबड्डी आणि खो- खो सह इतर खेळांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्याला सेवा देताना लाभलेल्या सहकार्याबद्द्ल ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रतिष्ठित लोकांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षण सभापती सहदेवजी बेटकर, रत्नागिरी शिक्षक पतपेढ़ीचे माजी संचालक दिलीप महाडिक, शिक्षक समितिचे माजी जिल्हाध्यक्ष रुपेश जाधव, जुनी पेंशन संघटना,संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष अमोल वाघमोडे, चिखली शाळेचे मुख्याध्यापक शेळके गुरूजी, तसेच म्हादे वाडीतील माजी शिक्षक सुरेश बाईत, प्रदीप तांबे,बाबासाहेब सानप, विनोद गमरे, रुपेश महाडिक आदि मान्यवर तसेच शाळा कमिटी सदस्य व म्हादेवाडी व शेंबवणे बौद्ध वाडीसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके गुरुजी यांनी मानले, तर आभार बाबासाहेब सानप यांनी मानले.