(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील नवरेकर यांच्या मालकीच्या सुमारे शंभर फुटाहून खोल असलेल्या विहिरीत रविवारी सकाळी काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. आवाज कसला आला विहिरीत काय पडले हे पाहण्यासाठी नवरेकर यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीवर असलेल्या झाकणासहीत आत गाय पडलेली असल्याचे त्यांना दिसले, व एकच गोंधळ उडाला. अति खोलविहीर त्यात भरपूर पाणी असल्याने विनंती करूनही गोमातेला वाचवण्याचे धाडस कोणीही करत नव्हते.
विहिरीत पडलेली गोमाता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. तर दुसरीकडे उपस्थितांपुढे गोमातेला कसं वाचवायचं अशा सतावणाऱ्या गोंधलात असतानाच पत्रकार सत्यवान विचारे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी देवरुख येथील वनविभागाच्या अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता आमच्याकडे अशी कोणतीही यंत्रणा नसून तुम्ही ग्रामपंचायतीला कळवा, असे थेट त्यांच्या कडून सांगण्यात आले. याच ठिकाणी एखादा वन्य प्राणी पडला असता तर वनविभागाने असेच उत्तर दिले असते काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
गो मातेला कसे वाचवायचे हा प्रश्न पडला असताना प्रादेशिक नळपाणी योजनेवरील निवृत्त कर्मचारी सीताराम रावनंग यांनी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता शिडीच्या साहाय्याने विहिरीत उतरण्याचे धाडस दाखवले व अतिशय खोल त्यात भरपूर पाणी असलेल्या विहिरीत उतरून तारेवरची कसरत करावी तशी कसरत करून गोमातेला दोरी बांधली आणि ग्रामस्थांना त्या दोरीच्या सहाय्याने गोमातेला बाहेर ओढण्यास सांगितले व त्यात त्यांना यशही प्राप्त झाले.
या कlमी मोलाची कामगिरी बाजावली ती सीताराम रावणंग यांनी, तर त्यांना संखते विभुते, गणेश पाथरे, समीर पाटील, संदेश बावधाने, तानाजी विचारे, विनोद नवरेकर, विरधवलं पाटील, जेसीपी, चालक पाटील, आदीनी सहकार्य केले. आपण एका गोमातेला जीवदान दिल्याचे समाधान ग्रामस्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी चांगलेच दिसत होते.