(चिपळूण)
चिपळूण मधील सावर्डेतदूषित पाण्यावरुन शेतकरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भर बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी ‘मला टार्गेट करु नका, मी हलका नाही, असे शेखर निकम म्हणाले. दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. कात भट्टीतील दूषित पाण्यावरुन सावर्डे भुवड वाडीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
कात भट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या गावात म्हणजेच सावर्डेत सध्या कात भट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटला आहे. पावसाळ्यात कात भट्टीतले काळे पाणी ग्रामस्थांच्या थेट विहीर आणि नद्यांमध्ये जात असून स्वच्छ पाणी दूषित होत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. या प्रश्नांवरून स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे वारंवार तक्रार करुन देखील संबधित कात भट्टी मालकाने उपाय योजना न केल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्यावर देखील प्रश्नांचा भडिमार केला. निकम यांना याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला. मात्र, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार शेखर निकम यांनी देखील मला टार्गेट करू नका असे म्हणत मी पण हलका नाही, असा इशाराच उपस्थित शेतकऱ्यांना भर बैठकीत दिला. दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.
कात भट्टीचे मालक मंत्री उदय सामंताचे निकटवर्तीय
दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या या भूमिकेवर सावर्डे भागातील ग्रामस्थांमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर कात भट्टीचे दूषित पाणी तत्काळ बंद न केल्यास सर्व महिला संबधित कात मालकाच्या दारात जाऊन बसतील असा इशारा देखील महिलांनी दिला आहे. कात भट्टीचे मालक पाकळे हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.