(चिपळूण)
जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात भाजप आपला उमेदवार श्री. विनय नातू यांना उभा करणार हे जवळपास निश्चित असताना तालुक्याचे विद्यमान आमदार श्री. भास्कर जाधव हे चिपळूण मधून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे गुहागर मधून विक्रांत जाधव की भास्कर जाधव या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा त्यांचे पुत्र विक्रांत जाधव याला सोडून ते चिपळूण मधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची जास्त शक्यता आहे. पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी नुकतेच कोकणचा दौरा केला. यावेळी आमदार जाधव यांची आमदार नार्वेकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.
गुहागर मध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची ताकद मजबूत आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचा चिपळूणमध्ये पराभव झाला होता. चिपळूण मधून ते सलग दोन वेळा विजय झाले होते. मात्र तिसऱ्या वेळी त्यांचा पराभव झाला. भास्कर जाधव यांना आपला पराभवाचा डाग मुलगा विक्रांत याला आमदार बनवून पुसायचा आहे. या संदर्भात भास्कर जाधव यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी चिपळूणमधील विषय हाताळून चिपळूणकडे लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने संधी दिल्यास आपण चिपळूणमधूनही लढू, असे सुताेवाच त्यांनी यापूर्वी केले हाेते.
पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधून इच्छुक असल्याचे समजते. त्याचबराेबर या मतदारसंघातून राेहन बने आणि राजेंद्र महाडिक हेही इच्छुक आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने, प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि राजेंद्र महाडिक हे इच्छुक आहेत. रत्नागिरी व चिपळूण मतदारसंघात इच्छुकांची संख्या यापेक्षाही अधिक आहे.