(रत्नागिरी)
ज्येष्ठ पत्रकार शेखरकुमार भुते यांचे रविवारी दुपारी शहरातील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. ‘मी रत्नागिरीकर’ या संघटनेतर्फे अडीअडचणीत सापडलेल्यांसाठी यांनी सातत्याने लढा दिला होता. शहरातील तेलीआळी येथील शेखरकुमार भुते त्यांच्या निर्भिड पत्रकारितेमुळे नावारुपाला आले होते. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेकांना न्यायही मिळाला होता.
साप्ताहिक ‘रंगयात्री’ व त्रैमासिक ‘निसर्ग’ चे मालक, संपादक म्हणून ते कार्यरत होते. काही काळ त्यांनी ‘दैनिक कोकण गर्जना’ मधूनही लेखन केले होते. परखड स्वभावामुळे आणि त्याहीपेक्षा अतिशय परखड लेखणीमुळे ते समाजात प्रिय होते. गेले दोन महिने ते आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजाताच पत्रकारिता तसेच अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांन हळहळ व्यक्त केली. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.