(रत्नागिरी)
प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे संगणकीकरण या उपक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या तालुक्यातील पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रतिनिधींना दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. नाबार्ड संस्थेकडून शिफारस करण्यात आलेल्या या सोसायटीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तसे पत्र मिळाले आहे. ही बाब पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटीसाठी अभिमानाची ठरली आहे.
सन १९४६ पासून कार्यरत असलेल्या पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटीची एकूण सभासद संख्या ९३३ एवढी आहे.पालीसह पाथरट, साठरे – बांबर, वळके, कापडगाव, चरवेली या गावांना ही संस्था सेवा देत आहे. एकूण १५.७७ लाख भाग भांडवल असलेल्या या संस्थे हे कोण गुंतवणूक १४.५६ लाख एवढी आहे. संस्थेने आतापर्यंत २४.२९ लाख रुपये कर्ज वाटप केले असून बँक पातळीवर कर्ज वसुली शंभर टक्के तर संस्था पातळीवर हे प्रमाण ७५ टक्के राखण्यात संस्थेला यश मिळाले आहे. संस्थेने आतापर्यंत सभासदांना १०% लाभांशही दिला आहे.
संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासदांच्या सहकार्याने संस्था सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे संगणकीकरण या उपक्रमांतर्गत संस्थेने सर्वोत्तम कामगिरी केली असून याची दखल नाबार्ड सारख्या संस्थेने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर नाबार्डने सदर संस्थेला २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्याची शिफारस रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली आहे. जिल्हा बँकेने तसे पत्र संबंधित संस्थेला पाठवले आहे. दरम्यान संस्थेचे संचालक जयप्रकाश गणपत पाखरे आणि सचिव प्रवीण अशोक राऊत हे दोन प्रतिनिधी दिल्लीला २६ जानेवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत हे संस्थेच्या संचालक मंडळामध्ये कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था उत्तम कामगिरी करत आहे. संस्थेला मिळालेल्या या बहुमानामुळे संस्थेचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.