(रत्नागिरी)
येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार आज जाहिर करण्यात आले. मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी २७ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मंडळाच्या जोशी पाळंदमधील भगवान परशुराम सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता पुरस्कार वितरणाचा शानदार कार्यक्रम होणार आहे.
यंदा (कै.) सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार तीन महिलांना देण्यात येणार आहे. साडी, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. क्वालिटी सर्व्हिसेसच्या माध्यमातून १५० हातांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योजिका वनिता उर्फ गीता परांजपे यांना गौरवण्यात येईल. गुहागर येथे खाणावळ चालवणाऱ्या उद्योजिका वसुधा जोग यांना हा पुरस्कार देण्यात येईल. तसेच दापोलीतील कर्णबधिर विद्यालय, वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ. रेखा बागूल यांनासुद्धा या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार सौ. राजश्री लोटणकर यांना जाहीर झाला आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातर्फे भगवद्गीतेतील विचारांचा प्रचार, प्रसार १९९८ पासून सौ. लोटणकर करत आहेत.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार दोन व्यक्तींना दिला जाणार आहे. कोकण रेल्वेत कामाच्या निमित्ताने मोटरसायकलद्वारे दोन वर्षांत लाखभर किलोमीटर आणि नंतर सातत्याने अहमदाबाद, पानिपत, पठाणकोट, श्रीनगर, कारगील, लेह, मनाली, चंदीगड, दिल्ली असा प्रवास भ्रमंती करणारे त्रिविक्रम शेंड्ये यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. भाटिमिऱ्या येथील आर्यन भाटकर यांना दिला जाणार आहे. रत्नागिरीतून मुंबईला जाताना बसचा टायर पेटल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांना जागे करून सुखरूप बाहेर काढून प्राण वाचवल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेत (तासगाव) इयत्ता बारावीत शिकणाऱ्या शिवम कर्चे याला दिला जाणार आहे. त्याचे शिक्षण जम्मू काश्मिर, डिफेन्स करिअर अॅकॅडमी येथे झाले आहे.
मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार दैवज्ञ पतसंस्थेचे संस्थापक सदस्य, दैवज्ञ भवनचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांना देऊन सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक असून महावितरणमधून करून सेवानिवृत्त झाले आहेत. युवा गौरव पुरस्कार अथर्व शेंड्ये (गणपतीपुळे) याला देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याने २०० ते ६०० किमी सायकल सुपर रॅंडोनिअर (एसआर) किताब पटकावला. हा किताब मिळवणारा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत तरुण सायकलस्वार अशी त्याची नोंद झाली आहे. याची दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. मंडळाचा सेवा गौरव पुरस्कार नाचणे गावचे सदस्य सुनिल सुपल यांना दिला जाणार आहे. नाचणे ग्रामपंचायत हद्दीत कोणी मयत झाल्यास त्या व्यक्तीच्या घरी जाऊन अंत्यसंस्काराची तयारी सेवाभावनेने करतात.
याशिवाय वडिलोपार्जित व्यवसाय वाढवून रत्नागिरी परिसर विकास, रोजगाराला हातभार लावल्याबद्दल आशिष नितिन लिमये, अॅड. तेजराज अभय जोग, नचिकेत दिलीप पटवर्धन या तिघांचा गौरव होणार आहे. उत्तम काम करणारी संस्था म्हणून सागरी सीमा मंच या संस्थेला ५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. विविध परीक्षांमधील यशाबद्दल विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे.
मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी म्हणून सुजित फडके (मूळ वाडा, देवगड) आणि मंडळाच्या कै. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर वसतीगृहातील मधुरा घुगरे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात येणार आहे. कै. सत्यभामाबाई फडके निधीतून मेघना गोगटे यांना आर्थिक साह्य दिले जाणार आहे. या वेळी ज्या सभासदांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास बापट, उपाध्यक्षा स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत. मंडळाच्या सर्व सभासद, हितचिंतकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.