(संगमेश्वर / एजाज पटेल)
पोस्ट कार्यालयातील एका हिंदी भाषिक कर्मचाऱ्याची उद्धट अरेरावीची मोठी चर्चा संगमेश्वर बाजारपेठेत ऐकण्यास मिळत आहे…”अभी कॅश नही मिलेगा”….कल आवो….., अभी लंच टाईम है…. हम हिंदी ही बोलेगा…. काय उखाडना है, उखाडो…अशा उर्मट आणि उद्धट पद्धतीने हा कर्मचारी वागत असल्याचा अनुभव अनेकांना येथे येत असून याच्या अंगात “वाल्मिकी कराड” घुसला की काय.? असा संतप्त सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. वरिष्ठांकडे तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने याचा “आका” आहे तरी कोण,..? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पत्रव्यवहार तसेच आर्थिक व्यवहाराची अनेक साधने उपलब्ध असली तरी भारत सरकारच्या पोस्ट कार्यालयावर सर्वसामान्य लोकांचा प्रचंड विश्वास कायम राहिला आहे. आर्थिक व्यवहारासाठी सर्वात सुरक्षित प्राधिकरण म्हणून आजही पोस्ट कार्यालयाची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक पोस्ट कार्यालयात नेहमीच ग्राहकांची गर्दी दिसून येते. परंतु या प्राधिकरणात काही अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून त्याचाच प्रत्यय आता संगमेश्वर पोस्ट कार्यालयात येत असल्याची खुलेआम चर्चा नाक्यांनाक्यावर ऐकण्यास मिळत आहे.
प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य असल्याचा आदेश महाराष्ट्र सरकारकडून काढण्यात आलेला असताना संगमेश्वर पोस्ट कार्यालयातील हा कर्मचारी दिवसभर चक्क हिंदी भाषेचा “अभिषेक” करत असतो, असेही अनेकांचे म्हणणे आहे. हिंदी भाषेबद्दल आम्हाला द्वेष नाही, परंतु महाराष्ट्रात मराठीतच बोला असे सांगून देखील छाती ठोकून हे महाशय “मै हिंदी ही बोलूंगा” क्या उखाडना है उखाडो” अशी राजकुमार स्टाईल भाषा वापरून येथे येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपला रुबाब दाखवत असल्याचे खुलेआमपणे बोलले जात आहे.
स्वतःच्या सोयीनुसार या साहेबांनी कार्यालयाचे शेड्यूल ठरवून आपली मनमर्जी सुरू ठेवली असल्याचीही चर्चा आहे. त्याच्या सोयी नुसारच कॅश देण्याची वेळ असते. अन्यथा “अभी कॅश नही मिलेगा”… “कल १२ बजे से पेहले आवो,.. अशा स्पष्ट शब्दात ग्राहकांना धुडकावून लावत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. जेष्ठ नागरिक, महिला अगदी वयोवृद्धांनाही हीच वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर मीडियाला देखील गृहीत धरण्यापर्यंत या “कुमाराची” मजल पोहचली आहे. असा मुजोर अधिकारी संगमेश्वरमध्ये बिनधास्त वावरत असल्याने आता संतापाची लाट उसळली आहे.
संगमेश्वरी “प्रसाद” मिळणार
संगमेश्वर ची शांत, संयमी, सुसंस्कृत लोकांचा तालुका म्हणून ओळख राहिली आहे. परंतु सर्वसामान्य लोकांवर अरेरावीचा अभिषेक होत असल्याने आता थेट संगमेश्वरी प्रसाद देण्याची तयारी युवक, कुमारांनी केली असून मुहूर्त येताच हा यथेच्छ प्रसाद दिला जाईल असे बोलले जात आहे. त्यावेळी कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, नंतरच अस्सल संगमेश्वरी हिसका कसा असतो हे समजेल. असेही येथील तरुण व ग्राहक संतापाने बोलत आहेत.
“वाल्मिकी कराड” अंगात घुसलाय का ?
राज कुमारी भाषा आणि “हम करेसो” या वृत्तीमुळे त्या कुमाराच्या शरीरात “वाल्मिकी कराड” घुसला की काय.?असा संतप्त प्रश्न पोस्टात जाणारे ग्राहक उपस्थित करत आहेत. तसे असेल तर ही कीड वेळीच ठेचून काढावी लागेल. शांत आणि संयमी सुसंस्कृत संगमेश्वरमध्ये असली थेरं अजिबात सहन केली जाणार नाहीत. अंगात घुसलेला वाल्मिकी कराड येथे नको, असे संगमेश्वर मधील सुसंस्कृत जाणकार लोकांचे म्हणणे आहे.
त्याचा “आका” आहे तरी कोण.?
संगमेश्वर पोष्टातील या वाल्मीकी कराड विरोधात या पूर्वीच प्राधिकरणातील जिल्हा अधिक्षकांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनेकांनी वरिष्ठांशी संपर्क देखील साधला आहे. तरी देखील त्याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे या अदृश्य वाल्मिकी कराड चा “आका” आहे तरी कोण.? कोणाच्या जीवावर हा इतका शिरजोर झाला आहे.? असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.