(नवी दिल्ली)
लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिराबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मंदिरात मिळणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने लाडूंमध्ये चरबी आणि बीफ असल्याची पुष्टी केली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अहवालात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी फिश ऑइल, बीफ आणि फॅटचा वापर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे लाडू केवळ प्रसाद म्हणून भक्तांमध्येच वाटले जात नव्हते तर हे लाडू प्रसाद म्हणून देवालाही अर्पण केले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमच्या नमुन्यांच्या तपासणीत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालात खळबळजनक खुलासे झाले आहेत. दुसरीकडे तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूवरून आंध्र प्रदेशात राजकीय वादळ उठले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांना कोंडीत पकडले आणि आरोप केला की मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुमला येथे तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली. हा प्रसाद भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या करोडो भाविकांना दिला जातो. सीएम नायडू यांनी आरोप केला होता की तिरुमलाचे लाडू देखील निकृष्ट घटकांपासून बनवले जातात.
भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, “हिंदूंसोबत झालेल्या मोठ्या विश्वासघातासाठी देव कधीही क्षमा करणार नाही. लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वाप करणे, तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी यांची पूजा करणाऱ्या हिंदूंच्या आस्थेसोबत करण्यात आलेला मोठा विश्वासघात आहे. इतर समुदायाच्या लोकांना आणि नास्तिकांना कर्मचारी म्हणून आणि टीटीडी बोर्डात सहभागी केल्याने भ्रष्टाचार आणि हिंदूंच्या आस्थेप्रति अनादर वाढेल, अशी चिंता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती.”
जगन सरकारच्या काळात लाडू प्रसाद तयार करताना त्यात गोमांसाची चरबी, डुकराची चरबी आणि माशाचे तेल याचा वापर केला जात होता. पण तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून हा प्रकार बंद करण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जात आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले. चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या ५ वर्षांत, आयएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ (मोफत अन्न) च्या गुणवत्तेशी तडजोड केली असून प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरून पवित्र तिरुमलाचे पावित्र्य भंग केले. या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे, तथापि, आमचे सरकार येथील शुद्धतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.