(गुहागर)
गुहागर पोलिस निरीक्षकांच्या बदलीबाबत योग्य ती चौकशी करून कोणी दोषी असल्यास कारवाई करू, असे आश्वासन अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बौद्धजन सहकारी संघ क्रमांक ४० च्या पदाधिकाऱ्यांना दिले. या आश्वासनानंतर अडूर येथील ग्रामस्थांनी मंगळवारी उपोषण स्थगित केले.
पोलिस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौद्धविहारला ठाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे पूजापाठापासून वंचित ठेवल्याचा आरोप अडूर येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गुहागरच्या पोलिस निरीक्षकांची बदली करण्याची मागणी करत बौद्धजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. ४० बौद्धजनच्या ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता तर दुसऱ्या बाजूला काही ग्रामस्थांकडून पोलिस निरीक्षकांच्या समर्थनार्थही उपोषण सुरू होते. तहसीलदार परीक्षित पाटील आणि विभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांनी ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते तरीही ग्रामस्थांनी जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत उपोषण आम्ही मागे घेणार नाही, असा निर्णय घेतला होता.
याबाबत अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मंगळवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. निःपक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित केले.
वाद भासविण्याचा प्रयत्न
आपल्यावरील आरोप झटकण्यासाठी, आमच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या आमच्याच समाजबांधवांचा आधार घेऊन दोन गटांमध्ये वाद आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.