(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील ग्रामविकास समिती चुनाकोळवण यांच्या माध्यमातून शिमगा उत्सव अतिशय जोशपूर्ण वातावरणात चालू आहे. गावदेवीची पालखी घरोघरी जाऊन आशीर्वाद देत आहे. सगळ्यात महत्वाची विशेष बाब म्हणजे गेली अनेक वर्ष पालखी उचलण्याचा, व नाचवण्याचा मान हा पुरुष वर्गाचा असे,पण ग्रामविकास समिती चुनाकोळवण च्या सर्व सदस्यांनी व पदाधिकार्यांनी ही परंपरा मोडीत काढून पालखी उचलण्याचा व नाचवण्याचा मान हा पंचक्रोशीत पहिल्यांदा महिलांना दिल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
गावचे सरपंच श्री श्रीकांत मटकर यांच्या आत्या, व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या बहिणाबाई स्वातीताई यांनी पालखी खांद्यावर घेऊन या बहुमानाची सुरवात केली. त्यामुळे महिला दिनाची अनोखी भेट या ग्रामविकास समितीने आपल्या भगिनी वर्गाला दिली आहे. त्यामुळे गावचे सरपंच व ग्रामविकास समिती गावचे गावप्रमुख श्री. तुळाजी बाबू मटकर , श्री. रवींद्र केशव मटकर तसेच ग्रामविकास समिती चुनाकोळवण चे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य वर्ग यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.