(रत्नागिरी)
गणपतीसाठी सासरी आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी शहरातील मांडवी येथे शुक्रवारी घडली. सोनाली दीपक पिलणकर (५३, रा. पिंपळवाडी-मांडवी, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव असून, त्यांच्या अचानक जाण्याने पिलणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोनाली पिलणकर या मुंबईतून गणपतीसाठी सासरी आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांना खोकला लागला. त्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना मिरकरवाडा येथील खासगी रुग्णालयात नेले होते. तिथे उपचार करून त्यांना घरी आणण्यात आले.
त्यानंतर रात्री ८:३० त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले व तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.