(रत्नागिरी)
शहरात काही बिल्डरांनी स्वतःचा व्यवसाय व्हावा, यासाठी इमारत परिसरात अनधिकृत प्रार्थनास्थळे बांधली आहेत. त्यामध्ये चोरीछुपे लहान मुले आणली जातात. त्यांना काय प्रशिक्षण देतात, हे तेथील रहिवाशांनाही माहिती नाही. भविष्यात काही अनर्थ घडू नये, यासाठी याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संबंधित ठिकाणी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांबाबत आमची काहीही तक्रार नाही. मात्र, त्यांनी याकडे लक्ष देऊन तेथे आपल्याकडे बाहेरून येणारे बांगलादेशी, रोहिंगे, नेपाळी असतील त्याचबरोबर तेथे बाहेरून येणारी छोटी मुले तेथे काय शिक्षण घेतात, याची माहिती घेऊन तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
बरेचसे बिल्डर आपला व्यवसाय चालण्यासाठी प्रार्थनास्थळे बांधून देत आहेत. त्या माध्यमातून अनैतिक कारभार होऊ शकतात. तेथे काय होणार आहे, याचा कोणताही विचार न करता हे बिल्डर केवळ आपल्या उत्पन्नाचा विचार करत आहेत. अशा बिल्डरांची यादी आपल्याकडे आली आहे. त्यासाठी लवकरच पाहणी करून त्या बिल्डरांची यादी आपण जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक इमारतींमध्ये पार्किंगच्या खाली प्रार्थनास्थळे उभारण्यात आली आहेत. याबाबत नगर परिषदेला कल्पना नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रत्नागिरीत फेरीवालेही आले आहेत. त्यांना कागदपत्रे कशी उपलब्ध झाली, ती त्यांना कुणी दिली. त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर, सचिन शिंदे उपस्थित होते.