(रत्नागिरी)
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. लाचलुचपत विभागाकडून आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा राजन साळवी (५०), शुभम राजन साळवी (२८, रा. दोन्ही खालची आळी, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
अटकेच्या निमित्ताने शुभम व अनुजा साळवी यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. अर्जातील माहितीनुसार राजन साळवी तसेच त्यांच्या पत्नीवर ३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
राजन साळवी यांची वारवार लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली होती. २२ जानेवारीलादेखील आमदार साळवी यांना चौकशीसाठी बोलाविले होते. अनुजा व शुभम साळवी यांच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्जावेळी न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आमदार साळवी व कुटुंबियांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीतून गुन्हा दाखल केला आहे. राज्यात सत्ताबदलानंतर साळवी हे सत्ताधारी पक्षासोबत गेले नाहीत, याच कारणातून त्यांच्यावर कारवाई केली आहे.