(रत्नागिरी)
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कुटुंबाला जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात ‘उबाठा’ सेनेचे आमदार राजन साळवी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या प्रकरणात मंगळवारीच त्यांच्या पत्नी आणि मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत आ. साळवी म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्या आणि कुटुंबाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आमची चौकशी सुरू केली. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आ. राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरोधात १८ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान, आमदार साळवी यांनी पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यालयात अर्ज केला होता. त्याठिकाणी तो अर्ज नामंजूर झाल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने आ. राजन साळवी यांना दिलासा मिळाला.