(रायगड)
लोन रिकव्हरी एंजन्ट्सच्या जाचाला कंटाळून अलिबाग येथील एका 50 वर्षीय शिक्षकाने आयुष्य संपवलं आहे. शिक्षकाने शुक्रवारी सकाळी उलवे जवळील अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. इन्स्टंट लोन अॅप कंपनीकडून घेतलेल्या लोनच्या वसुलीसाठी त्रास दिला जात असल्याने पीडित शिक्षकाने हे पाऊल उचललं. वैभव पिंगळे असे शिक्षकाचे नाव आहे. वैभव पिंगळे हे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चारचाकी घेऊन अटल सेतूवर आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव पिंगळे यांनी वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी गेल्या महिन्यात इन्स्टंट लोन अॅपवरून कर्ज घेतले होते. मात्र अॅप लोन फेडू न शकल्याने त्यांना वसुलीसाठी फोन येऊ लागले. तसेच रिकव्हरी एजंटने शिक्षकाचे मॉर्फ केलेले फोटो त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवल्याचाही आरोप आहे. कर्ज न भरल्यास बदनामी करण्याची धमकी त्यांना दिली जात होती. शिक्षकाने तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र नातेवाईक, शाळा आणि परिसरात अपमानाची भीती त्यांना वाटत होती.
वैभव इंगळे सकाळी 7.30 वाजता घरात काहीच न सांगता घराबाहेर पडले. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन घरीच ठेवला, त्यानंतर ते चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे पुलावरती जवळजवळ 9 किलोमीटर अंतर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि काही क्षणातच त्यांनी पुलावरून उडी मारली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी पार्क केल्याची घटना कैद झाली आहे. त्यापूर्वीच वैभव पिंगळे हे समुद्रात वाहुन गेले. पुलावरुन त्यांनी खाली उडी मारल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने, त्यांचा मृतदेह सुमारे 12 किमी अंतरावर आढळला.