(गुहागर)
सद्या शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान घरकुल (आवास) योजना आणि रमाई घरकुल योजना शहरी आणि ग्रामीण खेडेगावात राबविण्यात येत आहे. पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण खेडेगावात आर्थिक दुर्बल व कमी उत्पन्न गटातील कच्ची दगड-मातीची घरे व बेघर असलेल्या कुटूंबांसाठी तर रमाई घरकुल योजना ही मागासवर्गीय आर्थिक कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबांसाठी राबविली जाते. घरकुलाचे किमान क्षेत्र साधारणतः ३०० चौरस फुट असावे असी अट आहे. मात्र यासाठी सद्या असलेले अनुदान हे रू. १.२० मटेरियल (साहित्य) साठी तर रु. २६, ७३०/- कामाच्या मजुरी साठी दिले जातात. हि टप्प्या-टप्प्याने मिळणारी एकूण रू. १,४६,७३०/- अनुदानित रक्कम एकदम तुटपुंजी तर आहेच, अधिक घरकुलासाठी लागणाऱ्या एकूण साहित्यांवर कंबरडे मोडणारा १८% GST सुद्धा आहेच. तसेच बांधकाम साहित्यांचे वाढते भाव यामुळे सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना घरकुलाचे बांधकाम करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे, हे सत्य आहे.
सदर सोजना शहरी भागात सुद्धा राबवली जात आहे. परंतु शहरी भागातले घरकुल योजनेतील निकष आणि ग्रामीण खेडेगावातील घरकुल योजनेतील निकष यांंमध्ये अनुदानासहीत फार मोठी तफावत आहे. शहरी भागा प्रमाणेच घरकुलासाठी लागणाऱ्या साहित्यांचे भाव खेडेगावात सुद्धा आहेत. उलट खेडेगावात प्रमुख बाजारपेठा लांब पल्ल्यावर असतात तेथून साहित्य आणण्यासाठी वाहनखर्च अधिक मोजावा लागतो. शिवाय सौचालयाचा खड्डा पाडताना केवल दगड मातीच असेलच असे नाही. पुर्ण कातळ भागाचा असल्यास ब्लास्टींग करावे लागते. या खर्चाथा भारही अधिक पडतो.
सद्या शासनाच्या महसुल विभागाने वाळू माफियांंवर जबर बसविण्यासाठी अवैध वाळु उपश्यावर कठोर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे सर्वत्र खेडेगावात वाळुचा तूटवडा भासतो आहे. पात्र झालेल्या लाभार्थींना ९० दिवसांंत घरकुल बांंधून पुर्ण करण्याची अट आहे. मात्र वाळूचा तुटवडा असल्यामुळे घरकुल मुदतीत कसे पुर्ण करायचे ? हा मोठा प्रश्न घरकुल पात्र लाभार्थांसमोर उभा आहे. त्यासाठी शासनाच्या महसुल विभागातर्फे वाजवी भावात वाळू पुरवठा लाभार्थांना करणे गरजेचे आहे.
तरी सदर घरकुल योजने बाबत आपले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच संबंधित मंत्री यांनी राज्य सरकार तसेच केंद सरकार यांच्याकडे पाठपुरावा करून सदर घरकुल योजनांचे अनुदान किमान २.५० लाख करण्यात यावे, अशी मागणी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व केली आहे.