(कुडाळ)
कोकणातील लोकांनी या ठिकाणची हुकुमशाही यापूर्वीच गाडून टाकली आहे. जसे जमिनी बळकावतात त्यांना जमिनीखाली गाडतात तशाच पद्धतीने गुंडशाही करणाऱ्यांना येथील जनतेने गाडले आहे. महाराष्ट्रात चाललेली गुंडशाही, हुकुमशाही महाराष्ट्रातील जनता गाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील जनसंवाद मेळाव्यात व्यक्त केला.
जनसंवाद मेळाव्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे यांची रविवारी दुपारी कुडाळ येथील जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिक तसेच जनतेशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या वतीने ढोलताशांच्या गजरात भव्य पुष्पहार घालून ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या तथा महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपनेते गौरीशंकर खोत, सहसंपर्क प्रमुख प्रमुख बाळा म्हाडगुत, युवासेना कोकण विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, नागेंद्र परब, माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सचिन कदम, कृष्णा धुरी, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई: काळप, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, सचिन काळप आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते दुचाकींचे वाटप करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या या उपक्रमाचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी कौतुक केले. ठाकरे यांचे कुडाळ शहरात आगमन होण्यापूर्वीच उद्यमनगर तेथून जिजामाता चौक पर्यंत मोटरसायकल रॅली काढून शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, हा दौरा म्हणजे सभा नाही तर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. निवडणूक प्रचार सभा आणि विजयी सभेला आपण पुन्हा जिल्ह्यात येणार आहे. देशात भाजप आणि संघ परिवाराकडून एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. या हुकूमशाही विरोधात आपला लढा आहे. इथे आलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक हुकुमशाही विरोधात आहे. सरकार मध्ये गैंगवॉर सुरू आहे. भिंदे गैंग, भाजप गैंग असून सरकारमध्ये आतापर्यंत कधी घडली नव्हती अशी गोळीबाराची घटना ठाण्यात घडली. तो सरकार मध्ये सामील असलेल्या आमदाराला गोळीबार करावा लागला. सत्ताधारी पक्षांनी गुंडांना पक्षात घेतले आणि पोलिस ठाण्याच्या आवारात गोळीबार करावा लागतो हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.
माझ्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांची फौज
देशात भाजप सरकारकडून हुकुमशाही सुरू आहे, तर राज्यातील सरकारमध्ये गैंग वॉर सुरू आहे. माझ्याकडे भाडोत्री माणसे नाहीत, तर निष्ठावंत शिवसैनिकांची फौज आहे. तुमचे प्रेम हीच माझी ताकद आणि शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावर हुकुमशाहीला गाडल्याशिवाय राहणार नाही. जे कोकणवासियांनी केले तेच आता संपूर्ण महाराष्ट्र करून दाखवेल.
कणकवलीतील आमने-सामनेची आठवण
आमदार वैभव नाईक यांनी इथली गुंडागर्दी करणारी घराणेशाही यापूर्वीच्या निवडणुकीत गाडून टाकली आहे. वैभव नाईक यांच्याकडे पोलीस फौज, ईडी, सीबीआय काही नसताना ते विरोधकांना सामोरे जात भिडले होते. यावेळी शिवसैनिक रूपेश राऊळ जखमी झाला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी उभे राहून विश्वास दाखवला होता. आपणही लागलीच वैभव नाईक व सहकारी शिवसैनिकांना भेटण्यासाठी कणकवलीत त्यावेळी तातडीने आलो होतो, असे ठाकरे यांनी सांगून कणकवलीतील काही वर्षापूर्वी घडलेल्या आमने- सामनेची आठवण करून दिली.
गद्दारांना गाडण्यासाठी वैभव नाईक पुन्हा सज्ज
खासदार विनायक राऊत म्हणाले, कोकण आणि शिवसेना, कोकण आणि मातोश्री यांच्यात जर कोण दुरी माजवण्याचा करत असेल तर अशा गद्दारांना यापुर्वी सुद्धा येथील निवडणुकीत गाडण्यात आले आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना गाडण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आशीर्वादांमुळे मी व आमदार वैभव नाईक सज्ज आहोत.