(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे सध्या दिवाळी पर्यटन हंगाम पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. मोठ्या संख्येने झालेल्या या गर्दीत आज (मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी) आपल्या आई वडीलांसमवेत असलेली हर्षवी योगेश नाब्रिय (वय 2 वर्ष, रा. गंगापूर, औरंगाबाद) ही येथील गर्दीमध्ये एकटीच रडत फिरताना मिळून आली. ती पालकांचा हात सोडून बाजूला गेली होती. आई वडील जवळपास दिसत नसल्याने ती रडत होती. तर हर्षवी मिळून येत नसल्याने पालकही कासावीस झाले होते.
दरम्यान, गणपतीपुळे पोलिस कर्मचारी यांचेवतीने तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला सुखरूप त्यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. यासाठी अभिजित बाळकृष्ण बंडबे, रा. सह्याद्रीनगर, नाचणे, रत्नागिरी व सुनील पांडुरंग मेस्त्री, रा. वरवडे, रत्नागिरी यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले.
सध्या गणपतीपुळे येथे दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून विविध ठिकाणाहून भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. परंतु याच गर्दीच्या हंगामात येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये. तसेच आपल्या मवल्यवान वस्तूंची योग्य प्रकारे काळजी घ्यावी, असे आवाहन गणपतीपुळे पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.