(रत्नागिरी)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ झालेल्या अपघातात चुलते-पुतणे जागीच ठार झाल्याने नाणीज गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी वेल्डींगच्या कामासाठी नाणीज येथून अरुण अनंत दरडी (वय-३५) व रामचंद्र देवजी दरडी (वय-६५) वेल्डींगच्या कामासाठी खानू येथे दुचाकीवरुन जात असताना डंपरने जुन्या मठाजवळ पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये हे दोघे चुलते-पुतणे जाग्यावरच कोसळले व त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अरुण हा तरुण व्यवसायिक असल्याने त्याचा मोठा संपर्क होता. बघता बघता ही घटना पंचक्रोशीत पसरली आणि लोकांनी नाणीजकडे धाव घेतली. हे दोघे दरडीवाडी नाणीज येथील राहणारे असून अरुण दरडी हा तरुण वेल्डींगचे काम करतो. आपल्या हाताखाली त्याने चुलते रामचंद्र देवजी यांना कामासाठी ठेवले होते. अरुणचा मृतदेह विच्छेदनसाठी सर्वसाधारण रुग्णालयात आणण्यात आला तर रामचंद्र यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय पाली येथे ठेवण्यात आला. अरुण दरडी यांच्या मागे वडील, भाऊ असा परिवार असून रामचंद्र दरडी यांच्या मागे पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. या अपघात संदर्भात पाली दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे हे अधिक तपास करीत आहेत. चालक फरारी असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.