(रत्नागिरी)
तालुक्यातील खांबडवाडी-नाखरे येथे इको कार आणि ओला दुचाकी समोरा समोर धडकून भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आज (२६ मार्च) रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसूरकर (३०, रा. उंबरवाडी स्टॉप नाखरे, रत्नागिरी) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात इको कार चालक अनिकेत खाके (रा. नाखरे, रत्नागिरी) यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी चंद्रवदन शिंदे दसूरकर हा आपल्या ताब्यातील ओला दुचाकी (एमएच-08-बीजी-2916) घेऊन पावस ते नाखरे असा आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास अनिकेत खाके हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-47-एबी-2194) घेउन नाखरे ते पावस असा येत होता. ही दोन्ही वाहने खांबडवाडी येथे आली असता इकोकार चालक अनिकेत खाकेचा आपल्या कारवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरून येणाऱ्या चंद्रवदनच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे चंदवदनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रवदनचा अपघात त्याच्याच घरापासून एक किमी अंतरावर झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर खासगी रूग्णवाहिकेतून चंद्रवदनचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी उशीरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चंद्रवदन हा एक तरूण आंबा व्यावसायिक होता. दीड महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.