(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना येथील जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक यांनी वाचवले. ही घटना रविवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता घडली. अंशुमन पाठक (वय वर्षे 28) व सोनू शेख (वय वर्षे 32, दोन्ही राहणार मुंबई) अशी बुडताना वाचविण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.
रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेले अंशुमन पाठक आणि सोनू शेख दुपारच्या सुमारास येथील समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यांचा आवाज ऐकून किनारी असणारे जीवरक्षक महेश देवरुखकर, अजिंक्य रामाने, आशिष माने, उमेश महादये, अनिकेत चव्हाण, अनिकेत राजवाडकर आदींनी तसेच सुलभ-चालक निखिल सुर्वे आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी समुद्रात उड्या घेत दोन्ही बुडणाऱ्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.
यावेळी जीव रक्षक व स्थानिक व्यावसायिकानी वेळीच समुद्रात उड्या घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान याबाबत माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गावित व पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.