(रत्नागिरी)
मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजावरील सात भारतीयांचे अपहरण केले आहे. या घटनेत एकूण 10 खलाशांना बंधक बनवण्यात आले आहे. त्यापैकी 7 भारतीय आणि 3 रोमानियन आहेत. या बंधक खलाशांमध्ये रत्नागिरी येथील मिरकर समीन जावेद (ओएस) आणि सोलकर रिहान शब्बीर (ऑइलर) दोन तरूणांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने सर्व संबंधित व्यक्तींसह परराष्ट्र मंत्रालय, डीजी शिपिंग आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री यांयाकडे मदतीसाठी हाक दिली आहे.
‘एमव्ही बीटू रिव्हर’ या जहाजावर 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजता ही घटना घडलेली आहे. मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून 40 नॉटिकल मैल आग्नेय दिशेला चाच्यांनी हा हल्ला केला होता. या घटनेत 10 खलाशांना बंधक बनवण्यात आले आहे. या बंधक खलाशांमध्ये रत्नागिरी येथील मिरकर समीन जावेद (वय-25, रा. भाटकरवाडा, रत्नागिरी) आणि रिहान शब्बीर सोलकर (वय- 25, रा. कर्ला) या दोघांच्या कुटुंबीयांनी गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
याशिवाय तमिळनाडू, बिहार, लक्षद्वीप आणि केरळ येथील खलाशांचाही या बंधकांमध्ये समावेश आहे. त्यामध्ये या जहाजावर मुर्गन लक्ष्मण प्रदीप (दुसरा अधिकारी) रा.दिंडिगुल, तमिळनाडू, सिंह संदीप कुमार (डेक कॅडेट) रा. धनिच्छा, बिहार, सेल्वराज सतीश कुमार (तिसरा अभियंता) रा. करूर तमिळनाडू, असिफ अली रा. मिनिकॉय बेट, लक्षद्वीप, भार्गवन राजेंद्रन (मुख्य स्वयंपाकी) रा. कन्हांगड, केरळ हे खलाशी म्हणून कार्यरत आहेत.
जहाज आणि कंपनीची माहितीः-एमव्ही बीटू रिव्हर (आयएमओ क्रमांक 9918133) हे जहाज भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे संचालित आहे. या कंपनीचा परवाना क्रमांक आरपीएसएल – एमयुएम -162033 आहे. ती मुंबईतील गोरेगाव येथील लोटस कॉर्पोरेट पार्कमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे संपर्क क्रमांक नरेश कंवर (9136443961) आणि देवेंद्र पवार (9136443972) असे आहेत. या जहाजावर मुर्गन लक्ष्मण प्रदीप (दुसरा अधिकारी) – दिंडिगुल, तमिळनाडू, सिंह संदीप कुमार (डेक कॅडेट) – धनिच्छा, बिहार, सेल्वराज सतीश कुमार (तिसरा अभियंता) – करूर, तमिळनाडू, असिफ अली – मिनिकॉय बेट, लक्षद्वीप, मिरकर समीन जावेद (ओएस) – रत्नागिरी, महाराष्ट्र, सोलकर रिहान शब्बीर (ऑइलर) – रत्नागिरी, महाराष्ट्र, भार्गवन राजेंद्रन (मुख्य स्वयंपाकी) – कन्हांगड, केरळ हे खलाशी म्हणून कार्यरत आहेत. या सर्व खलाशांया आफ्रिकेत समुद्र चाच्यांकडून अपहरणाच्या घटनेने रत्नागिरीसह संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. खलाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी शासन, प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरीचे रहिवासी असलेल्या समीनचे वडील जावेद हसनमिया मिरकर आणि रिहानचे वडील शब्बीर अ. लतीफ सोलकर यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून आम्हाला आमच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिपिंग MA हा संचालनालयाकडून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून अद्याप कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत. यामुळे आम्ही तणावात असल्याची कैफियत मिरकर व सोलकर कुटुंबियांनी मांडली आहे.
या कुटुंबीयांनी सर्व संबंधित व्यक्तींसह परराष्ट्र मंत्रालय, डीजी शिपिंग आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्याशी तातडीने संपर्क साधून खलाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी केली आहे. त्याबरोबर रत्नागिरो पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणी लक्ष देउन शासनस्तरावरून मदती वेगाने कार्यवाही व्हावी अशा मागणी कैफियत पत्रकारांसमोर मांडली आहे. आमचे मुलं गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम आफ्रिकेत अडकली आहेत. आम्हाला मुंबईत डीजी शिपिंगकडे जाणे शक्य नाही. म्हणूनच आमच्या मुलांबाबत लवकरात लवकर माहिती मिळावी, असे कुटुंबीयांनी भावनिक आवाहन गुरूवारी रत्नागिरीत शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी जावेद मिरकर, शब्बीर सोलकर यांयासह फैरोज मजगांवकर, सहल फणसोपकर हे देखील उपस्थित होते.
द मेरीटाईम एक्झिक्युटिव्हच्या म्हणण्यानुसार, मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ टोमे आणि प्रिन्सिप या बेट राष्ट्रातील प्रिन्सिप बेटावर, सांतो अँटोनियो डो प्रिन्सिपच्या आग्नेयेस सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर अनधिकृत लोक जहाजावर चढले होते. अशा बातम्या एका आठवडय़ापूर्वी आल्या तेव्हा अपहरणाचा पहिला संकेत मेरिटाईम विभागाला मिळाला होता, असेही म्हटले जात आहे. ईओएस रिस्क ग्रुपच्या म्हणण्यानुसार, पश्चिम आफ्रिकेतील समुद्री चाच्यांसाठी पश्चिम आफ्रिकन प्रदेश एक नवीन अड्डय़ात बदलला आहे. जानेवारी 2024 पासून इक्वेटोरियल गिनी आणि गॅबॉनमधून सहा जहाजांवर चढाई करण्यात आली होती. त्यात तीन समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात 14 क्रू सदस्यांचे अपहरण करण्यात आले होते.
केरळच्या कन्हागड जिह्यातील भार्गवन राजेंद्रन या 35 वर्षीय तरूणाच्या पत्नीने भारताच्या जहाजबांधणी मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. राजेंद्रन भार्गवन यांच्या पत्नी वाणी यांनी 17 मार्च रोजी राजेंद्रन यांच्याशी संपर्क तुटल्याचा दावा केला आहे आणि त्यांना वाटते की त्यांची सुरक्षा आणि जीव धोक्यात आहे. त्यांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी सर्वोच्च पातळीवरील सरकारी कारवाईची मागणी केली आहे. मी, माझ्या कुटुंबासह, या प्रकरणात तुमच्या तातडीच्या प्रतिसादाची आणि मदतीची अपेक्षा करत असल्यो पत्राद्वारे केंद्राकडे मागणी केलेली आहे.