(चिपळूण)
तालुक्यातील कोंढे- चंदनवाडी येथील एका शेतात आलेल्या मगरीला वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या प्रथमेश पवार व प्रणीत कलकुटकी यांनी पकडून चिपळूण वनविभागाच्या ताब्यात दिले. ही मगर जवळपास ५ फूट लांबीची आहे.
चिपळूण शहरातील तलाव, वाशिष्ठी व शिवनदीत ठिकठिकाणी मगरींचा वावर वाढलेला आहे. सातत्याने येथील लोकांना मगरीचे दर्शन होते. तालुक्यातील कोंढे चंदनवाडी येथे शेतात मगर आल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यानुसार या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीशी संवाद साधत त्याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. काहींनी या घटनेची माहिती वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयास दिली. त्यानुसार प्रथमेश पवार व प्रणीत कलकुटकी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठा पाऊस झाल्याने शेतात चिखल होता.
त्यामुळे मगरीला पकडण्याचे काम जिकिरीचे होते. मात्र, या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या साथीने मोठ्या शिताफीने मगरीला पकडले. या मगरीला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.