(धारणी)
भारतात पहिल्या दहामध्ये स्थान कायम ठेवणार्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या मेळघाटचे नाव सध्या कुपोषणासाठीसुद्धा परिचित आहे. या आदिवासी भागात ऐतिहासिक किंवा पौराणिक स्थळ कमी असले तरी महाभारत युगातील अनेक संदर्भ येथे सापडतात. चिखलदरा जवळच्या आलाडोह गावानजिक ब्रह्मसती नदीच्या काठावर देवीच्या दोन मूर्ती असून एक दक्षिण मुखी तर दुसरी उत्तर मुखी आहे. वनवासीयांच्या जीवनात या दोन मूर्तींचे महत्त्व अनादि काळापासून आहे. या एकाच दगडावर कोरलेल्या लहान मूर्ती आहेत. चिखलदरा भागातील रानमाथ्यावर वास्तव्य करणार्या गवळी आणि आदिवासी समाजासाठी दैवत असलेल्या या ब्रह्मसतीच्या दोन मूर्ती वेगवेगळ्या दिशेने आहेत. दवाखाने नसलेल्या काळापासून हे खुले देवालय एका चिकित्सा केंद्राचे काम करीत आहेत.
छोटी माता व बडी माताची बाधा असलेल्या बाळ रुग्णांना ब्रह्मसती नदीत स्नान करून देवीचे दर्शन करण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने आजही आहे. ओल्या शरीरानेच येथे पूजन करण्यात येत असते. चिखलदरा येथे पर्यटनासाठी येणार्या नवयुवकांना या मूर्ती एकदम लक्षात येत नाही, मात्र स्थानिक लोकांसाठी हे एक जागृत देवस्थान आहे. चैत्र महिन्यात येथे नवरात्री दरम्यान यात्रा भरत असते. डॉक्टरांच्या उपचाराने रोगनिदान न झाल्यास लोक येथे ब्रह्मसती नदीच्या डोहात स्नान करतात. प्रामुख्याने गवळी समाजाची येथे जास्त श्रद्धा आहे. हिमालयामधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा आहे तर सातपुड्याच्या उंच भागातून निघणारी ब्रह्मसती नदी आहे. सती म्हणजे सच्ची म्हणूनच येथे लोकांना सत्याचा साक्षात्कार होतो. नदी जवळच्या उंच खुल्या भागात दोन मूर्ती आहेत. माहितीनुसार, महाभारत काळात पांडवांच्या अज्ञातवासात पांडव वैराट राज्यात वास्तव्यास होते. यावेळीच देवी पॉईंटवरील देवी प्रस्थापित झालेली होती. तेव्हाच ब्रह्मसती पण येथे अवतरल्याचे गवळी समाजाचे कार्यकर्ते रघुजी खडके यांनी सांगितले.
भीमाने किचक नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून किचकदरा नाव या भागाचे पडले. मात्र बोलता-बोलता हे नाव चिखलदरा म्हणून प्रचलित झाले. किचकाचा वध केल्यावर ज्या नदीच्या पात्रात भीमाने रक्ताने माखलेले हात धुतले तो भीमकुंड म्हणून आजही पर्यटकांसाठी सर्वात जास्त प्रेक्षणीय स्थळ आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीपासून गवळी समाज मेळघाटात वास्तव्याला आहे. धारणी आणि चिखलदरा भागात आदिवासी समाजानंतर सर्वात मोठा समाज म्हणजे गवळीच ! चिखलदरा जवळच्या आलाडोह गाव शिवारातील या दक्षिणमुखी व उत्तरमुखी देवी एक श्रद्धेचे स्थान मानले जाते. पश्चिममुखी नद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाटात ब्रह्मसती नदी मात्र दक्षिणमुखी आहे, हे एक विलक्षण आश्चर्य आहे.
महाभारतातील विराट राजाचे राज्य असलेल्या मेळघाटात आजही वैराट नावाचे गाव ओळखले जाते. खुल्या आकाशाखाली असलेल्या दक्षिणमुखी देवीसमोर लहान बाळांच्या आरोग्यासाठी पूजा केली जाते तर उत्तरमुखी देवीसमोर सुख – शांती – धन – समृद्धीसाठी उपासना केली जाते. येथे अंधविश्वासाचे समर्थन करण्याचे प्रयोजन नाही. मात्र, भक्तांनी दिलेल्या माहितीवरून या मान्यतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बाळांच्या आरोग्यासाठी दर्शन करण्याची परंपरा असल्याने बालकांचे ओले कपडे पूजा स्थानावरच सोडले जात असतात. देवीच्या मूर्तीवर सूर्य व चंद्र कोरलेले असल्याने या दोन्ही ग्रहांची पूजा सुद्धा महत्त्वाची ठरते. मेळघाटबाहेरील लोकांसाठी हे एक अनोळखी देवस्थान आहे.