(जालना)
मराठा आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये रविवारी घेण्यात आलेल्या निर्णायक सभेत मोठे नाट्य बघायला मिळाले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळाल्याचा सगळा दोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ’राज्यात फडणवीसांच्या आदेशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांनी मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझा बळी हवा आहे का?’ फडणवीस, तुला बळी पाहिजे ना?, चल घे, मी येतोय मुंबईला सागर बंगल्यावर असे म्हणत जरांगे उठले आणि गाडीत बसून थेट फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी ‘सागर’ बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारून दाखवावे, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ते आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही, असेदेखील जरांगे म्हणाले.
छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. ब्राह्मणी कावा मला फडणवीस दाखवत आहेत. पण, फडणवीस काय चिज आहे हे मला माहिती आहे. अनेक नेते आज भाजपमध्ये का येत आहेत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण, फडणवीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.
भाजपला मोठे करणा-या मुंडे बहिणींची काय अवस्था करण्यात आली आहे. त्यांची घुसमट सुरू आहे. धनंजय मुंडे सध्या गपगार बसले आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे मी सलाईन देखील घेणे सोडून दिले आहे. माझं एन्काउंटर करण्याचे फडणवीस यांचं स्वप्न आहे. फडणवीस यांच्या मनात असतं तर लगेच सगेसोय-याचा निर्णय झाला असता, असे जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांसोबत दोन-तीन मराठ्यांचे आमदार आहेत. शिंदेंचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. पण, मी पण शेतक-याचा, मराठ्याचा मुलगा आहे. मी फडणवीसांना पुरून उरेन. देवेंद्र फडणवीसांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य तेच चालवत आहेत. फडणवीसांना कुणी पुढे गेलेले आवडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला लावले जात आहे. ५ महिने झाले फडणवीस गुन्हे मागे घ्यायला तयार नाहीत. मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या. मी लगेच सागर बंगल्यावर येतो. त्यांना माझा बळी हवा आहे. मला काही झाले तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका. मराठ्यांत आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, अशी घणाघाती टीका जरांगेंनी केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी पायी उपोषण करत आपण सागर बंगल्याकडे जात असून त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. असे त्यांनी म्हटले. तसेच पायी निघाले असताना जरांगे यांची तब्बेत बिघडल्याचेही समोर येतेय. या अगोदर मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत, असे त्यांनी म्हटलं आहे.